लातूर : आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र शासन गंभीर नाही. मराठा समाजासह धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संवेदनशील आहे. मात्र, शासनाकडे धोरण नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत खा. सुप्रिया सुळे यांनी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस हल्ल्याला गृहमंत्रालय जबाबदार असल्याचा आरोप केला.
खा. सुप्रिया सुळे या अंबाजोगाई येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी गुरुवारी सकाळी लातूरमार्गे आल्या होत्या. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, राज्यात दुष्काळ आहे. चारा पाण्याची सोय नाही. पाऊस झाला नसल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये टंचाई आहे. यावर शासनाकडून कोणत्याच उपाययोजना नाहीत. शिवाय, वेगवेगळ्या समाजाच्या मागण्यांवरही सरकार गंभीर नाही. मराठा समाजासह लिंगायत, मुस्लिम, धनगर या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन बारामती येथे आमच्या घरासमोर सभा घेऊन दिले होते. त्याचा त्यांना विसर पडला आहे. जालना जिल्ह्यात तर आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवरच पोलिसांनी लाठी हल्ला केला. त्याला जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
शासन आपल्या दारी हास्यास्पद कार्यक्रम...शासन आपल्या दारी हा हास्यास्पद कार्यक्रम असल्याची टीका करत खा.सुळे म्हणाल्या, ईडी, सीबीआय आपल्या दारी आहे. तिकडे केंद्रात इंडिया आघाडीचा धसका सरकारने घेतला आहे. त्यामुळेच त्यांनी प्रेसिडेंट ऑफ भारत असे नामकरण करण्याची चर्चा सुरू केली आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आणि दुष्काळावर चर्चा करायला मात्र, त्यांना वेळ नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. तर राज्यामध्ये जयंत पाटील अध्यक्ष आहेत. या पक्षात कुठलीच फूट नाही, असेही खा. सुळे म्हणाल्या.
अजेंडाविना अधिवेशन....केंद्राने १८ सप्टेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. परंतु अधिवेशनाचा अजेंडा माहिती नाही. कुठल्या विषयावर अधिवेशन आहे, याची कोणत्याही सदस्याला कल्पना नाही. विरोधी पक्षांशी अधिवेशन घेण्यासंदर्भात सल्लामसलत केलेली नसल्याचेही खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.