लातूर : बाद फेरीतील आपले वर्चस्व कायम राखत यजमान नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाने पहिल्या चार संघांत स्थान मिळवून साखळी फेरीत प्रवेश केला आहे.
नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठ व लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीने लातुरात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेतील बादफेरीचे सामने अटीतटीचे झाले. शुक्रवारी यजमान नांदेड विद्यापीठाने कडप्पाच्या योगी वेमना विद्यापीठाचा एकतर्फी १२ धावांनी पराभव करीत शानदार साखळी फेरीत प्रवेश केला.
जळगाव विद्यापीठाने भारतीय विद्यापीठ पुण्याचा अटीतटीच्या लढतीत ५-१ ने पराभव करीत साखळी फेरी गाठली आहे. यासह भुवनेश्वर विद्यापीठाने औरंगाबादच्या बामु विद्यापीठाचा १०-० ने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात जळगावने भुवनेश्वरचा १२-० ने पराभव केला. अमरावती विद्यापीठाने हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचा एकतर्फी पराभव केला. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा ११-३ ने पराभव केला.
दिल्ली विद्यापीठाने कोट्ट्याम विद्यापीठाचा अटीतटीच्या लढतीत ७-५ ने पराभव केला. कोल्हापर विद्यापीठाने पंजाब विद्यापीठाचा ६ धावांनी पराभव केला. यासह यजमान नांदेड विद्यापीठाने बेळगाव विद्यापीठाचा ७-० ने पराभव केला. यासह महाराष्ट्राच्या यजमान नांदेड विद्यापीठासह जळगाव व नागपूर संघाने साखळीत प्रवेश मिळविला आहे. बाद फेरीतील एक सामना शनिवारी होणार असून, चौथा संघ साखळीत कोणता येणार, हे या सामन्यानंतरच कळेल.
निरीक्षक प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य पंच मुकुल देशपांडे यांच्यासह अभय बिराज, अभिजीत इंगोले, प्रसाद यादव, चेतन महाडिक, स्वप्नील राऊत, सुशील गजभिये, शुभम पाटील, प्रशांत कदम, अक्षर पाटील, आशिष येवले, सुजय कालपेकर, कोमल शेंडे, मिलिंद दर्प, मिलिंद तळेले, निखिल कोल्हे, मोहसीन पठाण, विकास वानखेडे, राहुल खंदारे, प्रसन्नजीत बनसोडे, मंगेश इंगोले आदी पंच म्हणून काम पाहत आहेत.
महाराष्ट्राचा दबदबा... अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धेतील बाद फेरीत महाराष्ट्रातील विद्यापीठाचा दबदबा दिसून आला. नांदेडसह जळगाव व नागपूर संघाने साखळीत प्रवेश करून महाराष्ट्राच्या विद्यापीठाचा वरचष्मा दाखविला. साखळी फेरीत मात्र महाराष्ट्रातील विद्यापीठच आमनेसामने येणार आहेत.