राजकुमार जाेंधळे / लातूर : घरफोडीच्या गुन्ह्यातील दाेघा आरोपींना विवेकानंद चाैक ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी बेड्या ठाेकल्या असून, सोन्या-चांदीसह राेकड असा १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाैकशीत घरफोडीच्या चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील विवेकानंद चौक ठाण्याच्या हद्दीत रात्री घर फाेडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील आराेपींना अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनात विवेकानंद चाैक ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. या घरफाेडीबाबत खबऱ्याने माहिती दिली. या माहितीची खातरजमा करून पथकाने म्हाडा येथील दाेघा संशयितांना उचलण्यात आले. त्यांची कसून चाैकशी केली असता, सुशांत शिवाजी गायकवाड (वय २६) आणि कृष्णा ऊर्फ किरया गुंडेराव लोंढे (२२ दाेघेही रा. रा. म्हाडा कॉलनी, लातूर) असे त्यांनी आपली नावे सांगितली. विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्यांनी म्हाडा कॉलनीत घरफाेडी केल्याचे कबूल केले. चाेरीतील मुद्देमाल सुशांत गायकवाड याच्या घरात ठेवल्याचे सांगितले. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई विवेकानंद चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलिस निरीक्षक पंकज शिनगारे, पोलिस अंमलदार खुर्रम काझी, यशपाल कांबळे, गणेश यादव, रवी गोंदकर, रणवीर देशमुख, आनंद हल्लाळे, संजय बेरळीकर, महारूद्र डिगे, रमेश नामदास, अनिता सातपुते, दीपक बोंदर यांच्या पथकाने केली.