लातूर : हॅलो, मी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. बोलतो. आपल्या पत्नी गरोदर आहेत. त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घेता. त्यांना ॲनिमिया आहे. त्यामुळे कुठे उपचार घेता, अशी गरोदर मातेची चौकशी करीत शासकीय दवाखान्यात सर्व सुविधा आहेत. तेथून सेवा घ्या, असा सल्ला देत जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील गर्भवती महिलेच्या पतीशी संवाद साधला. त्यामुळे या मातेचे कुटुंब आनंदी झाले.
निमित्त होते, जिल्हा परिषदेच्या वतीने गरोदर व स्तनदा मातांच्या सहाय्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जीवनरेखा कॉल सेंटरच्या उद्घाटनाचे. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. बरुरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सतीश हरिदास, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष चोले आदी उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील माता- बालकांसाठी विविध सेवा दिल्या जातात. त्याची गुणवत्ता वाढावी, शासकीय आरोग्य सुविधांचा जास्तीत जास्त मातांनी लाभ घ्यावा. माता-मृत्यू होऊ नये म्हणून जीवनरेखा कॉल सेंटर सुरु करण्यात आल्याचे सीईओ अभिनव गोयल यांनी सांगितले. याअंतर्गत अतिजोखमीच्या मातांना सुरक्षित प्रसूतीसाठी जास्तीत जास्त मदत करणे, शासकीय यंत्रणेचा समन्वय ठेवण्यात येणार आहे.
पुढे संवाद साधताना जिल्हाधिकारी म्हणाले, ॲनिमियामुळे गरोदरपणात जोखीम जास्त आहे. शासकीय आरोग्य संस्थेत सुविधा आहेत. त्या घ्याव्यात. तसेच रक्तवाढीचे इंजेक्शन घ्यावे. तसेच आहार चांगला घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. काही वेळानंतर सदर गरोदर माता नजीकच्या शासकीय दवाखान्यात जाऊन रक्तवाढीचे इंजेक्शन घेतल्याचा निरोप तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य विभागास दिला.