अहमदपूर : राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू असून, शासनाने ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू केली आहे. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने मुदतवाढ देण्यात आली असली तरी एसआरपीएफ, जिल्हा पाेलीस व लोहमार्ग, चालक या गटात एक अर्ज भरता येतो. मात्र, अनेक उमेदवार एकाच गटात दोनपेक्षा अधिक अर्ज भरत आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम असून, त्यामुळे याबाबत नियमवाली जाहीर करण्याची मागणी होत आहे.
९ नोव्हेंबरपासून राज्यात पोलिस भरतीसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी राज्य सरकारने संकेतस्थळावर माहिती भरण्याचे आवाहनही केले आहे. त्यामुळे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अनेक तरुणांनी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केली. मात्र, एका गटात किती अर्ज भरता येणार याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे एकाच गटात दोनपेक्षा अधिक अर्ज भरण्यात येत आहे. परिणामी, उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत संकेतस्थळावर नियमावली जारी करण्याची मागणी होत आहे.
लवकरात लवकर निर्णय घ्यावा...गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र, अर्ज भरताना अडचणी येत असल्याने मुदतवाढ मिळाली असली तरी कोणत्या गटात किती अर्ज भरावेत यावरुन उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. तो दूर करावा. - प्रा. रमेश भारती
पोलिस भरतीची सुरुवात झाल्या तारखेपासून पोर्टल व्यवस्थित चालत नाही. रजिस्ट्रेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ई-मेलवर व्हेरिफिकेशन कोड प्राप्त होत आहे. त्यानंतर फार्म भरण्यासाठी एक दिवस जात आहे. - गायत्री काशीकर
उमेदवार म्हणतात...मागील वर्षी स्पष्टता नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी नियमानुसार फॉर्म भरले. काहीजणांनी जास्त ठिकाणी फॉर्म भरून शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा दिली. जास्त फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली. त्यामुळे अर्ज किती ठिकाणी भरता येईल, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.- क्रांती कांबळे
जास्त ठिकाणी अर्ज भरून संधी नाही मिळाली तरी चालेल; परंतु नंतर जास्त अर्ज भरले म्हणून आम्हाला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येऊ नये. कारण, ४० टक्के विद्यार्थी दुबार अर्ज भरत आहेत. शासनाकडून स्पष्टता नाही. त्यात वारंवार सर्व्हर डाऊन येत आहे.- शुभम पाटील