लातूर : दोन्ही हात नसलेल्या गौस शेख याने पायांच्या बोटांनी पेपर लिहिला अन् बारावीच्या परीक्षेत ७८ टक्के गुण मिळविले. ही किमया साधणारा गौस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्याने आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.
लातूर तालुक्यातील वसंतनगर तांडा (महापूर) येथे रेणुकादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा असून, तिथेच गौस अमजद शेख याने पहिली ते बारावीपर्यंतचे विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले आहे. जन्मत: दोन्ही हात नसलेल्या गौसने जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले. कितीही संकटे आली तरी खचून न जाता त्याने मात केली आहे. त्याला आई-वडिलांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले. याच शाळेत गौसचे वडील अमजद शेख हे सेवक म्हणून कार्यरत असून, आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती जेमतेम असतानाही गौसने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. दोन्ही हात नसल्याने त्याने पायांच्या बोटांनी लेखणी धरली आणि पेपर लिहिला.
दिव्यांगांसाठीचा अतिरिक्त वेळही नाकारला...माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिव्यांग मुलांसाठी बोर्ड परीक्षेत अतिरिक्त वेळ दिला होता. मात्र, गौस शेख याने पायांच्या बोटांनी पेपर लिहीत असताना अतिरिक्त मिळणारा वेळ नाकारला. इतर विद्यार्थ्यांसोबतच त्याने वेळेत पेपर सोडवत ७८ टक्के गुण मिळविले. त्यास चित्रकलेचाही छंद असून, पायाने तो सुंदर चित्रकृती साकारतो. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच इथपर्यंत आलो आहे. आता स्पर्धा परीक्षेकडे वळणार असून, आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस असल्याने गौस शेख याने सांगितले.