लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या कमलकिशोर अग्रवाल यांच्या ऑइल पेंट गोडाऊनला शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रुद्ररूप धारण केले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या पाच बंबानी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. गोडाऊनमधील ऑईलपेंटचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळावर पोहचले असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
गंजगोलाई परिसरात राजकमल इंद्राज अग्रवाल यांचे गोयल ट्रेडर्स नावाचे ऑईलपेंटचे गोडाऊन आहे. चार मजली इमारत असलेल्या या गोडाऊन परिसरात शहराची मुख्य बाजारपेठ आहे. अचानक दुपारी या इमारतीच्या चौथ्या मजल्यात आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट पसरले होते. आगीची घटना कळताच महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत चौथ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यापर्यंत आग पसरली होती.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या पाच बंबने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. गंजगोलाईमधील सराफ लाईन, मिरची लाईनचा परिसर पोलिसांनी सील करून वाहतुकीस बंद केला होता. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला बऱ्यापैकी यश आहे. आगीत गोडाऊन मधील ऑईलपेंटचे अनेक डबे जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. पूर्ण आग आटोक्यात आल्यानंतर नुकसानीचा पंचनामा होणार आहे.