लातूर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सध्या मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एकीकडे टंचाईमुळे महापालिका पाणी कपातीचा निर्णय घेत आहे. तर दुसरीकडे जोडजवळा भागात संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मांजरा धरणावरून लातूरला पाणी पुरवठा केला जातो. यासाठी लातूर-कळंब रोडलगत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. लातूर तालुक्यातील जोडजवळा भागात वारंवार जलवाहिनीमधून गळती होते. रविवारी संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आवाज आला. यानंतर काही क्षणातच पाण्याचे फवारे उंचावर उडू लागले. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने जवळपास पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथून दूरपर्यंत पाणी वाहत होते. बाजूच्या शेतात तर जणू नदीच्या पुराप्रमाणे पाणी जमा झाले आहे. रात्री आठ वाजेपर्यंतही कमी दाबाने पाणी येत होते. लातूर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीतून नेहमीच गळती होत असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे सध्या लातूर शहराला पाणी पुरवठा कमी होत आहे. मांजरा धरणात मृतसाठा असल्याने महापालिका पाणी कपातीचा निर्णय घेण्याच्या विचाराधीन आहे. यावर प्रशासनाकडून नियोजनही करण्यात आले आहे. यातच जलवाहिनी फुटल्याने वाहून गेलेले लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे दिसून येत आहे. जोडजवळा नजिक फुटलेल्या जलवाहिनीमुळे शेजारच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्याला तळ्याचे स्वरुप आले आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने ते तातडीने थांबविता आले नाही. जवळपास एक तास उंचावर पाण्याचे फवारे उडत होते. जलवाहिनी फुटल्याची माहिती लातूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला मिळताच तातडीने मांजरा धरणावरील पाणी उपसा करणारी मोटार बंद करण्यात आली. मात्र तब्बल एक तास पाणी वाया गेले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंतही जलवाहिनीतील पाणी काही प्रमाणात वाया जात होते. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने गळती दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले. यामुळे पाणी पुरवठा बंद आहे.
दुष्काळात तेरावा; लातूरमध्ये पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 8:50 PM