औराद शहाजनी : सतत पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तेरणा व मांजरा नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, दोन्ही नद्यांच्या संगमावर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हे पाणी शेकडो एकरवरील शेतात घुसल्याने खरिपातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी व कर्नाटक सीमा भागात सतत पाऊस होत आहे. त्यामुळे तेरणा व मांजरा या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यातच मांजरा नदीत धनेगाव प्रकल्पाचे पाणी साेडण्यात आले तर तेरणा नदीवरील उच्चस्तरीय बंधारे पूर्णपणे भरल्याने तेथील अतिरिक्त पाणी नदीपात्रात साेडण्यात आले आहे. त्यामुळे या नद्यांच्या संगमावर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे औराद शहाजानी, तगरखेडा, हालसी, वांजरखेडा, काेंगळी, जामखंडी भागातील शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
पुराच्या पाण्यामुळे खरिपातील सोयाबीन, ज्वारी, ऊसासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तसेच सततच्या पावसामुळे बागायती उत्पादनातही मोठी घट झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
सतत होत असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या संततधार पावसामुळे नदीतील पाणीपातळी वाढून पूर आला आणि नदीकाठची शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. ही पिके पाण्यातच सडत आहेत.
शेती उत्पादनात घट होत असताना १५ दिवसांत सोयाबीनचे दर निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही पदरी पडेल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. सध्या काही शेतकरी सोयाबीनची काढणी करत आहेत. अशा परिस्थितीत पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे काढणीचा दर वाढला असून, प्रत्येक बॅगला चार ते साडेचार हजार रुपये मजुरी घेतली जात आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने नुकसानाचे तत्काळ पंचनामे करुन पीक विमा द्यावा, अशी मागणी होत आहे.
संकटामुळे शेतकरी झाले हतबल...
औराद शहाजानी येथील नदीकाठाजवळील शेतकरी जलिलमियाँ नाईकवाडे, मुस्ताक नाईकवाडे, खादरसाब नाईकवाडे, बालाजी भंडारे, श्रीरंग खरटमोल, इसाकमियाॅं नाईकवाडे, शिवपुत्र आगरे, दिगंबर माने, दत्ता माने, बालाजी शिवाजी भंडारे, अनंत भंडारे, बिरनाळे, दत्ता ढोरसिंगे, नारायण कुलकर्णी, कन्हैय्या पाटील, अनिकेत पाटील, सैलानी नाईकवाडे तसेच तगरखेडा येथील नदीकाठावरील रामराव थेटे, व्यंकटराव थेटे, धनराज गिरी, शाहुराज थेटे, सुभाष डावरगावे, बाबू बेलुरे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांमध्ये पाणी साचले आहे.
लवकरच पंचनामे सुरु होणार...
मांजरा व तेरणा नदीकाठच्या गावातील शेतशिवारांमधील पिकांमध्ये पाणी साचले आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांनी केल्या आहेत. त्यानुसार लवकरच पंचनाम्याला सुरुवात करण्यात येणार आहे, असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांनी सांगितले.
पंचनामे करण्याच्या सूचना...
महसूल, कृषी, ग्रामसेवक या तिघांचे संयुक्त पथक तयार करुन मांजरा व तेरणा नदीकाठावरील शेतशिवारात पाणी साचून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच नदीकाठच्या गावांमधील जनतेला सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले.
आतापर्यंत ८३० मिमी पाऊस...
शनिवारी ३५ मिमी पाऊस झाल्याची नोंद येथील हवामान केंद्रावर झाली आहे. आतापर्यंत एकूण ८३० मिमी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.