अहमदपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून हडोळतीला ओळखले जाते. त्यामुळे येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही ग्रामपंचायत १७ सदस्यांची आहे. या निवडणुकीसाठी ६७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १९ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात ४८ उमेदवार राहिले आहेत. दरम्यान, प्रभाग ३ मधून मीरा प्रदीप नायणे तर प्रभाग ४ मधून प्रदीप नायणे हे पती- पत्नी बिनविरोध निवडून आले आहेत.
या प्रभागातील जागा अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी राखीव होत्या. दरम्यान, सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. मात्र, ऐनवेळी शासनाने सरपंचपदाचे आरक्षण रद्द केले आहे.
सरपंचपदाची लॉटरी न लागल्यास सत्तेच्या चाव्या आपल्या हाती रहाव्या म्हणून बहुमतासाठी लागणाऱ्या ९ जागांसाठी पॅनलची जुळवाजुळव होत आहे. दरम्यान, बहुतांश इच्छुकांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यास पसंती दिली आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल, तसतसा निवडणुकीत रंग भरणार आहे. बहुतांश ठिकाणी सरळ दुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. दोनपेक्षा अधिक उमेदवार असलेल्या ठिकाणी काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.