लातूर : शहरातील एका नातेवाइकाकडे काैटुंबिक कार्यक्रमासाठी आजी, मावशी, नातेवाइकांसाेबत आलेल्या एका ११ वर्षीय मुलीचा हाॅटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना साेमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रात्री घटनेची नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील एका नातेवाइकाकडे मुंजीचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. मुंजीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनी, नातेवाइकांनी अंबाजाेगाईला राेडवर शिवाजीनगर पाेलिस ठाण्यालगत असलेल्या एका हाॅटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले हाेते. दरम्यान, कार्यक्रम आटाेलपल्यानंतर काही नातेवाईक हाॅटेलमध्ये थांबले हाेते. दुसऱ्या मजल्यावरील खिडकीत बसलेली आद्या विनीत देशपांडे (वय ११, रा. हैदराबाद) ही अचानक खाली जमिनीवर काेसळली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.
घटनेची माहिती शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांना मिळल्यानंतर पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनातून जखमी मुलीला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने पाठवून दिले. तेथील डाॅक्टरांनी जखमी मुलीला मृत घाेषित केले. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले करत आहेत.