लातूर : ज्या सुविधा मिळत नाहीत, त्याचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये, असे पत्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांना पाठविले आहे.
८ आॅगस्ट रोजीच्या परिपत्रकात म्हटले आहे, १४ मार्च २०२० रोजी अधिसभेत ठराव झाला होता. त्यानुसार ज्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नाहीत, त्यांचे शुल्क आकारू नये. क्रीडा, वार्षिक अंक अथवा युवक महोत्सव यासंदर्भाने विद्यार्थ्यांचा सहभाग नसेल अथवा त्या सुविधा मिळत नसतील तर शुल्क परत करावे असे म्हटले आहे. सदर ठरावानुसार महाविद्यालयाने वार्षिक अंक काढणे, विद्यार्थ्यांनी युवक महोत्सवात सहभागी होणे आवश्यक आहे, अन्यथा शुल्क परत करावे लागेल, असे निर्देश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी पत्रात दिले आहेत. विशेष म्हणजे शैक्षणिक वर्षे २०१९ ते २०२० मध्ये किती विद्यार्थ्यांनी युवक महोत्सवात सहभाग घेतला तसेच वार्षिक अंक काढला का याची लेखी माहिती ३० आॅगस्टपर्यंत विद्यापीठाला कळवण्याच्या सूचना दिल्या आहेत.