लातूर - आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहेच. आपल्याकडे पंतप्रधानपदासाठी एकच नाव आहे ना? पण विरोधकांकडे एकही नाव नाही. तुम्हीच सांगा विरोधकांचा पंतप्रधान कोण ? शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव किंवा औवेसींना करायचं का पंतप्रधान ? असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या महाआघाडीवर टीका केली. तसेच हिंमत असेल तर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करा ? असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लातूर येथील महायुतीच्या सभेत बोलताना भाजपाच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात, विरोधकांवर टीका करताना पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण ? असा प्रश्न विचारला आहे. जाहीरनाम्याचे समर्थन केले आहे. भाजापाने जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेसने हा जुनाच जाहीरनामा असल्याची टीका केली. त्यावर बोलताना, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा जाहीरनामा हा तर इंदिरा गांधीच्या काळातीलच असल्याचे म्हटले. तसेच भाजपाच्या जाहीरनाम्याबाबत मोदींना धन्यवाद दिले. जाहीरनाम्यातील वचनांमुळेच शिवसेना आणि भाजपाची युती झाली आहे. राम मंदिर, काश्मीरचे 370 कलम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी हा जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
काँग्रेसने भाजपाच्या जाहीरनाम्यावर टीका केली. पण, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात किती थापा आहेत. इंदिरा गांधींपासून देशात गरिबी आहे. केवळ गांधी घराण्याची गरिबी गेली, पण सर्वसामान्यांची गरिबी कधी जाणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेत विचारला. मोदी सरकार हे दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणारं आहे. पाकिस्तानने कुरापत काढली तर, आम्ही केवळ बोलून दाखवत नाही की ठोकून काढू. आम्ही ते करुन दाखवलं. उरी असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल या सरकारने पाकिस्तानला ठोकून दाखवलं आहे. पाकिस्तानवर एकदाच घाव घाला, की पाकिस्तानचा नामोनिशाण शिल्लक राहता नये, असा तोडगा काढा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केली.
मराठवाडा ही मर्दांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, रझाकारांविरुद्ध लढणारी ही भूमी आहे. वल्लभाई पटेल रझाकार या सुलतानी संकटाशी लढले, आता नरेंद्रभाईंनी असमानी संकटावेळी आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे हीच अपेक्षा असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विमा कंपन्यांचा मुद्दाही उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडला.