लातूर : जिल्ह्यात यंदा पावसाने वार्षिक सरासरीएवढीही बरसात केली नाही. त्यामुळे नदी- नाले वाहिले नाहीत. परिणामी, खरीप हंगामास फटका बसण्याबरोबरच आता रब्बी हंगामाचेही क्षेत्र घटणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सरासरी एकूण २ लाख ८० हजार ४३८ हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. आतापर्यंत जवळपास २५ हजार हेक्टरवरही पेरा झाला नाही.
यंदाच्या पावसाळ्यात विलंबाने पाऊस होण्याबरोबरच सुरुवातीस पिकांपुरता पाऊस झाला. जुलैअखेरपासून ते ऑगस्टमध्ये तर पावसाने ओढ दिली. त्यामुळे खरिपातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५४० मिमी पाऊस झाला आहे. पावसाने वार्षिक सरासरीही गाठली नाही. मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह रेणा, तिरू आणि लहान नद्याही वाहिल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांसह तलावात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्यामुळे यंदा पाणीटंचाई संकट लवकरच येण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरवर्षी परतीचा जोरदार पाऊस होतो आणि त्याचा रब्बी हंगामास लाभ होतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे यंदाही परतीचा पाऊस होईल, अशी आशा होती. परंतु, ती हवेतच विरली आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार असून, पेरा घटणार असल्याचे पाहावयास मिळत आहे.
औसा तालुक्यात सर्वाधिक रब्बीचे क्षेत्र...तालुका - अपेक्षित पेरालातूर - ५१६२८औसा - ६२६८३अहमदपूर - २१६४८निलंगा - ४८१५५शिरुर अनं. - १३५३३उदगीर - ७९२५चाकूर - २४१०४रेणापूर - ३४१८३देवणी - १३९१४जळकोट - २६६९एकूण - २८०४३८
आतापर्यंत २५ हजार हेक्टरवर पेरा...जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख ८० हजार ४३८ हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. दरम्यान, सध्या शेतकरी खरिपातील सोयाबीनच्या राशी आटोपत आहेत. सोयाबीनच्या राशी केलेले शेतकरी जमिनीतील ओल पाहून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्याची लगबग करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून पेरणीस सुरुवात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास २५ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
दोन लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा अपेक्षित...जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचा २ लाख १९ हजार ४७५ हेक्टरवर पेरा होणे अपेक्षित आहे. तसेच रब्बी ज्वारीचा ३२ हजार ९४३, गव्हाचा १६ हजार १६, करडईचा ६ हजार ९७४ हेक्टरवर पेरा होणे अपेक्षित आहे, असा अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने वर्तविला आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार...यंदा पावसाअभावी खरिपातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर यल्लोमोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फटका बसला आहे. जलसाठा न झाल्याने आता रब्बी हंगामावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे.