लातूर : अवैध शस्त्र बाळगणाऱ्या २३ जणांविराेधात लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर एकूण ८९७ पैकी ६६८ जणांनी पाेलिस ठाण्यात शस्त्रे जमा केली आहेत.
निवडणूक आचारसंहिता जाहीर हाेताच परवानाधारक शस्त्र (पिस्टल, रायफल, बंदूक) जमा करून घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. दरम्यान, अग्निशस्त्रे जमा करण्याचे आदेश देताच लातूर जिल्ह्यातील ८९७ पैकी ६६८ जणांनी आपल्याकडील शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा केली आहेत. शिल्लक शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. जमा करण्यात येणारी अग्निशस्त्रे आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर परत देण्यात येणार आहेत. मोठे व्यावसायिक, उद्याेजक, राजकारणी, त्याचबराेबर विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून स्वरक्षणासाठी शस्त्रपरवाना काढला जातो. हा शस्त्रपरवाना जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या वतीने दिला जाताे. गृहविभागाच्या परवानगीने ही शस्त्रे दिली जातात.
लातूर जिल्ह्यात ८९७ जणांकडे शस्त्र परवाना...
लातूर जिल्ह्यातील एकूण ८९७ जणांनी शस्त्र परवाने घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक काळात वादविवाद, वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या संयुक्त समितीच्या वतीने पिस्तूल, रायफल आणि इतर अग्निशस्त्रे जमा करून घेण्याचे निर्देश सर्व ठाणेदारांना दिले आहेत.
तर सुरक्षारक्षकांना वापरता येईल शस्त्र...
बँक व वित्तीय संस्थांत कार्यरत सुरक्षारक्षकांची अग्निशस्त्रे जमा करण्यात येणार नाहीत. आजपर्यंत ८९७ पैकी ६६८ जणांनी संबंधित ठाण्यात शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. उर्वरित शस्त्रे येत्या दोन दिवसांमध्ये जमा करण्यात येणार आहेत. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शस्त्रे जमा करण्यात येत आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे दरराेज आढावा घेत आहेत.
तलवार, गावठी कट्टे वापरणाऱ्यांना दणका...
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत विनापरवाना गावठी कट्टे, धारदार तलवार, खंजीर, कत्ती, चाकू बाळगणाऱ्या एकूण २३ जणांविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना पाेलिसांनी चांगलाच हिसका दाखवत अद्दल घडविली आहे. सध्या पाेलिसांकडून विशेष मोहीम राबवून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविराेधात कारवाई केली जात आहे.