औसा (जि. लातूर): औसा तालुक्यातील लोदगा येथील जवान गणपत लांडगे हे कर्तव्य बजावताना सियाचीन येथे शहीद झाले.त्यांच्यावर शासकीय इतमामात रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.चार दिवसापासून शहीद जवानांच्या अंतीम दर्शनासाठी प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो नागरिकांनी अश्रू ढाळत अखेरची सलामी दिली. विर जवान अमर रहे,शहीद गणपत लांडगे अमर रहे,भारत माता की जय असा घोषणा देत आपल्या सुपुत्रास अखेरचा निरोप देण्यात आला.
बुधवारी पहाटे सियाचीन येथील ग्लेशियर चुम्मठाणा डेटकँम्प मध्ये आँक्शिजनच्या कमतरतेमुळे युनिट ६ महार बटालियन चे जवान गणपत लांडगे शहीद झाले होते.कोरोना व वातावरणातील बदलामुळे पार्थिव आणण्यास विलंब झाला. आज ४ थ्या दिवसीजन्मगावी पहाटे ५:३० वाजता पार्थिव आणण्यात आले.त्यानंतर संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढून पार्थिव गावातील शिवाजी चौकाच्या बाजूस आणण्यात आले.अंत्ययात्रेत मोजकेच लोक उपस्थित होते.प्रत्येकांनी घरासमोरुनच शहीद जवानांस अखेरची सलामी दिली.यावेळी प्रत्येकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते.मनमिळाऊ स्वभाव,केंद्र शासनांची तेही सैन्यातच सेवा करण्याची इच्छा उराशी बाळगणाऱ्या गणपतच्या आठवणीने वयोवृद्ध, तरुण,मित्रमंडळीने अखेरचा निरोप देताना हंबरडा फोडला.अमर रहे अमर रहे,गणपत लांडगे अमर रहे च्या जयघोषाने लोदगा नगरी दुमदुमून गेली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ ग्रामपंचायतीच्या जागेत सैन्य दलाच्या जवानासह पोलिस पथकांने मानवंदना दिल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी दोन वर्षाच्या आयुषसह लहान भाऊ संपती लांडगे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी खा.ओमप्रकाश राजे निंबाळकर, आ.अभिमन्यू पवार,माजी आ.पाशा पटेल,जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने,जिल्हा सैनिक अधिकारी ओंकार कापले,नायब सुभेदार चंदरसिंग पाल,संतोष सोमवंशी,अभय सांळुके,उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे,तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ, माजी सैनिक भिमराव,गोमदे, संजय अभंगे,सरपंच गोपाळराव पाटील, पांडुरंग चेवले, पोलिस अधिकारी राजीव नवले, माजी सैनिक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, परिवारातील सदस्य, नातेवाईक व मित्रमंडळीची उपस्थिती होती. अहमदनगर येथील आरमड कोर सेंटरच्या पथकाने शहीद जवानास अंतिम मानवंदना गार्ड आँफ आँनर देण्यात आला. यासह पोलिस पथकाने ही मानवंदना दिली.
पुष्पवृष्टी आणि रांगोळीने रस्ते सजले
गावचे सुपुत्र सिमेवर कर्तव्य बजावताना शहीद झाले. त्या वीर जवानाच्या स्वागतासाठी गावातील अंतर्गत रस्ते देशभक्ती पर सुविचार,चित्रांने रंगले होते.कोरोनांच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टेंसिंगचा अवलंब करून महिला,तरुणी,व युवकांनी अंत्ययात्रेच्या वेळी शहीद जवानांची जागोजागी आरती करुन पुष्पवृष्टी केली. यावेळी अनेकांचे डोळ्यातुन अश्रू वाहत होते.
माझा मुलगा देशासाठी अमर झाला...माझा मुलगा गेल्याचे मला दु:ख आहे.पण देशासाठी तो शहीद झाल्याचा अभिमान असून तो अमर झाला.पोटचा गोळा होता, म्हातारपणांची माझी काठी गेली.पण तो देशाच्या कामी आल्याचा सार्थ अभिमान असल्याचे वडिल सुरेश लांडगे यांनी सांगितले.तर माझा वाघ गेला,आम्हाला सोडून,आज तो अमर झाल्याचे आई सिंधबाई लांडगे यांनी सांगितले.
मी पंधरा दिवसात येईन...माझी सियाचीन मधील तीन महिन्याची ड्युटी संपली,मी सुखरुपणे ग्लेशियर वरुन डाऊन झालो.तब्येत खराब आहे.पण आता बरं वाटेल.लवकरच आमच्या युनिटची बदली पठाणकोटला होईल,अन् मी वरिष्ठांना सांगून पंधरा दिवसात गावी येईन,प्रकृति चांगली झाली तर लवकरच भेटू,असे पत्नीला शेवटचं बोलताना शहीद जवान गणपत बोलले.