लातूर : पथविक्रेत्यांच्या नियोजित जागेवर पार्किंग झोन कसे करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करीत पथविक्रेत्यांनी लातूर मनपा कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून गंजगोलाईमध्ये ५ बाय ५ चे पट्टे तयार करून दोनशे पथविक्रेत्यांना बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र अचानक सदर जागेवर पार्किंग झोन करण्यात आले. हा पथ विक्रेत्यांच्या पोटावर पाय आहे, असा आरोप करीत मुस्लिम विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली पथविक्रेत्यांनी धरणे आंदोलन केले. निवेदनावर सत्तार शेख, मनोज शिंदे, जब्बार बागवान, त्रिंबक स्वामी, शेख शादुल, शेख फिरोज, मेहताब बागवान, रौफ बागवान, खलिल सय्यद, मुस्तफा शेख, खाजा बागवान, निवृत्ती राऊत, इलियास बागवान, गफूर बागवान आदींची नावे आहेत.
जागा न दिल्यास कर्ज फेडणे अशक्यनियोजित हॉकर्स झोनमध्ये पथविक्रेत्यांना बसविण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. लॉकडाऊन काळामध्ये लहान उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी १० हजार रुपये कर्ज स्वरूपात दिले आहेत. सदरील पथविक्रेत्यांना जर जागा उपलब्ध करून दिली नाही, तर कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्नही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पथविक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.