औसा येथे प्राजक्त तनपुरे यांनी ऊर्जा विभागाची बैठक घेतली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय देशमुख, ‘मांजरा’चे संचालक अशोकराव काळे, महेंद्र भादेकर आदी उपस्थित होते. यावेळी आ. धीरज देशमुख यांच्या वतीने लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध मागण्यांचे पत्र देण्यात आले.
शेतकऱ्यांची विजेची मागणी वाढली आहे; पण रोहित्रात सतत बिघाड होत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच, घर आणि शेतातून गेलेल्या विद्युत तारा लोंबकळत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ दुरुस्तीचे आदेश द्यावेत. येल्लोरी (औसा), शिवनी खु. (लातूर), घनसरगाव (रेणापूर) येथे सबस्टेशन तर शिवली (औसा), भेटा (औसा), ममदापूर (लातूर) येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफाॅर्मर मिळावेत, अशी मागणी यावेळी ऊर्जा मंत्र्यांकडे करण्यात आली.