राजकुमार जाेंधळे / रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील बिटरगाव येथे एकाच रात्री चोरट्यांनी सहा घरे फोडून १ लाख ३८ हजार रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून, याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील बिटरगाव (ता. रेणापूर) येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने मनोहर गणपती दणदणे यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून प्रवेश केला. ज्या खोलीत कुटुंब झोपले होते, त्या खोलीच्या दरवाजाला कोंडी लावून दुसऱ्या खोलीचे कुलूप तोडून कटापातील ९ ग्रॅम सोन्याचे गंठण, ८ ग्रॅम वजनाचे दागिने, १ तोळा ७ ग्रॅम आणि ७० हजार रोख रक्कम, असा ऐवज लंपास केला. त्याच भागात घराशेजारील ज्ञानेश्वर देवीदास जगताप यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात चाेरट्यांनी प्रवेश करत पेटीतील १ तोळा सोन्याचे दागिने आणि ७० हजारांची राेकड लंपास केली, तर मेघराज सुधाकर जाधव, अन्सार बासूमियाँ शेख, इस्माईल पाशमियाँ शेख, ताहेर तय्यब शेख यांच्या घराकडे चाेरट्यांनी मोर्चा वळविला. त्यांच्याही घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. मात्र, चोरट्यांच्या हाताला येथे काहीच लागले नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जिलानी मान्नुल्ला, बीट जमादार बालाजी डप्पडवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. लातूर येथील श्वान पथकाला पाचारण केले हाेते. मात्र, चोरट्याचा माग काढता आला नाही. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले कैद...रेणापूर तालुक्यातील बिटरगाव येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या घरफोडीच्या घटनेतील दाेघे चोरटे गावातील ग्रामपंचायतीलगत असलेल्या किराणा दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र, त्यांचे चेहरे अस्पष्ट दिसत असल्याचे रेणापूर ठाण्याच्या पाेलिसांनी सांगितले.