तांदुळजा : लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील सात शेतकऱ्यांच्या शेतातील पाणबुडी विद्युत मोटारी व केबल वायर अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुरुड पोलिसांत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांदुळजा येथील बळीराम झारे हे बुधवारी रात्री गट क्र. १५८ मधील शेताकडे गेले होते. रात्री त्यांनी शेतात नांगरणी करून घेतली आणि मध्यरात्री घरी आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी ते शेतातील जनावरांना चारापाणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा ते विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले असता सौर उर्जेवरील ५ एचपीची मोटार आणि केबल दिसून आले नाही. त्याची किंमत १० हजार रुपये आहे.
दरम्यान, त्यांना शेजारील शेतकरी बालाजी झारे, संदीपान झारे, आदिनाथ झारे, नवनाथ कदम, दशरथ झारे व लक्ष्मण गणगे (रा. तांदुळजा) यांच्या शेतातील पाणबुडी मोटारी व केबल चोरीस गेल्याचे समजले. या सातही विद्युत मोटारींची एकूण किंमत जवळपास ७० हजार रुपये आहे. याप्रकरणी बळीराम झारे यांच्या फिर्यादीवरून मुरुड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार उद्धवराव पाटील हे करीत आहेत.