औसा : रेणापूर येथील गिराधारी तपघाले प्रकरणातील आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, केज तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खुन करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, खुंटेगाव येथील समाज मंदिरास मंजूरी देण्यात यावी या मागण्यांसाठी औसा-लातूर महामार्गावरील औसा टी पाईंटवर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बुधवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवाशांची काही वेळ तारांबळ उडाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आले. आंदोलनात मराठवाडा महिला अध्यक्ष मायाताई लोंढे, युवा जिल्हाध्यक्ष सर्वदीप खलसे, तालुकाध्यक्ष काकाभाऊ गोरे, महादेव हारगे, अजय कांबळे, निर्मलताई गायकवाड, सिताताई गायकवाड, दिनेश कांबळे, निलेश कांबळे, विकास गोरे, लहु गोरे, सुनील गोरे आदींसह पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.