राजकुमार जाेंधळे
कमलनगर (जि. बीदर) : बीदर येथून औराद बाऱ्हाळीकडे निघालेल्या भरधाव बसला अचानक आग लागली. यावेळी बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे १९ प्रवाशांचा जीव वाचला आहे. कर्नाटक राज्य महामंडळाच्या ‘द बर्निक बस’चा थरार बीदर जिल्ह्यातील कप्पीकेरी पाटीनजीक बुधवारी घडला. आगीमध्ये बस पूर्णत: खाक झाली आहे.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची औराद बाऱ्हाळी आगाराची बस (के.ए. ३८ / १०३३) बुधवारी सकाळी ९ वाजता बीदर स्थानकातून औराद बाऱ्हाळीकडे मार्गस्थ झाली. दरम्यान, औराद आठ किलाेमीटर अंतरावर असताना कप्पीकेरी पाटीनजीक धावत्या बसमध्ये शॉर्टसर्किट झाले आणि आग लागली. बसमधून धूर येत आहे, शाॅर्टसर्किट झाल्याचे लक्षात घेताच बसचालक मारोती चिटगीरे यांनी तातडीने बसचा वेग कमी केला. बस रस्त्यालगत थांबवली. याची बसवाहक बालाजी म्हैत्रे यांना माहिती दिली. या दाेघांनीही क्षणाचा विलंब न करता बसमधील प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर उतरविण्याचा प्रयत्न केला. बसमधील एकूण १९ प्रवाशांना बसमधून बाहेर काढत त्यांना बसपासून दूर अंतरावर थांबविले. त्यावेळी पाहता-पाहता आगीने राैद्र रुप धारण केले. काही वेळात या आगीमध्ये बस पूर्णत: जळून खाक झाली. रस्त्यावर बसचा जळालेला सांगाडाच उभा राहिला.
चालकाच्या प्रयत्नामुळे बसमधील प्रवासी बचावले...बस चालकाच्या प्रसंगावधानाने एकूण १९ प्रवासी बालंबाल बचावले आहेत. आगी लागल्याचे लक्षात येताच त्यांनी बस रस्त्यालगत थांबवून प्रवाशांना तातडीने खाली उतरण्याचे आवाहन केले. यामध्ये बसचे माेठे नुकसान झाले आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांचे आग आटाेक्यात आण्याचे प्रयत्न...बीदर-औराद बाऱ्हाळी महामार्गावर धावत्या बसला अचानक आग लागल्याची माहिती आगार प्रमुखांना मिळाली. या माहितीनंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या बंबांना घटनास्थळी पाचारण केले. काही तासाच्या प्रयत्नानंतर आग आटाेक्यात आण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये बस पूर्णत: जळून खाक झाली आहे.