निलंगा (जि. लातूर) : शहरातील महाराष्ट्र बँकेलगतच्या कॉम्प्लेक्समधील दुकानांना रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये जवळपास तीन दुकाने भस्मसात झाली असून, तब्बल ५० ते ६० लाखांचे नुकसान झाले आहे.
निलंगा शहरातील लातूर-बीदर महामार्गावर महाराष्ट्र बँकेलगत कॉम्प्लेक्स असून, येथील दुकानांना रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग एवढी माेठी हाेती की, काही वेळातच कपड्याचे तिन्ही दुकाने आगीत खाक झाली. आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांनी केला. मात्र, आगीने राैद्र रूप धारण केल्याने ते शक्य झाले नाही. रविवार असल्याने दुकानदार आपली दुकाने रात्री ८ वाजता बंद करून घराकडे गेले हाेते. दरम्यान, साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका कापड दुकानाला आग लागली. पाहता-पाहता लगतच्या दोन-तीन दुकानाला आगीने आपल्या गरड्यात घेतले. ही दुकाने पत्र्याची असून, प्लायवूडचा अधिक वापर असल्याने काही वेळातच आगीचा भडाका उडला अन् दुकाने खाक झाली.
तीन व्यापाऱ्यांचे झाले लाखाे रुपयांचे नुकसानआगीमध्ये राम क्षीरसागर यांच्या शिव कलेक्शन कापड दुकानाचे २० लाख, योगेश विश्वासराव गायकवाड यांच्या सुविधा कलेक्शन कापड दुकानाचे ३० लाख तर अरुण देशमुख यांच्या देशमुख कलेक्शन कापड दुकानाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. त्याचबराेबर सर्व फर्निचर, दुकानातील कपडे असे जवळपास ५० ते ६० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आगीचे कारण अस्पष्ट; क्षणात झाली दुकाने खाकअचानकपणे आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिक, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी दुकानांचे शटर ताेडून आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग एवढी माेठी हाेती की ही तीनही दुकाने आगीमध्ये खाक झाली. रात्री उशिरापर्यंत ही आग कशामुळे लागली? याचे कारण समाेर आले नाही.
घटनास्थळी नागरिक धावले; अग्निशमन दलाने केला प्रयत्नमाजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशमनला रवाना केले. महावितरण कर्मचाऱ्यांना माहिती देत परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक बी.आर. शेजाळ, हवालदार दादा शिंदे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. यावेळी माजी सभापती ईश्वर पाटील, भाजपाचे रवी फुलारी, सुमित इनानी, प्रकाश पटणे, दीपक नाईक, सुनील अग्रवाल, पिंटू पाटील, संजय भोसले, पंढरी सगर आदींसह स्थानिक नागरिकांनी आग आटाेक्यात आणण्यासाठी धाव घेतली.