लातूर : प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात मागील वर्षभरात १ हजार १३९ क्षयरुग्ण उपचाराने ठणठणीत झाले आहेत. सध्या १८७१ रुग्णांवर उपचार सुरु असून, जानेवारी ते १५ मार्च २०२३ या कालवधीत ४७५ नव्या क्षयरुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने २१ मार्चपर्यंत क्षयरुग्ण शोध मोहीम राबविली जात असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
टीबीमुक्त भारत करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याअंतर्गत क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहे. रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी निक्षय पोषण आहार योजनेतंर्गत प्रतिमाह ५०० रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. दरम्यान, याचा लाभ जिल्ह्यातील १८७१ क्षयरुग्णांना होत आहे. ८ मार्चपासून सक्रीय क्षयरुग्ण शोधमोहीम राबविली जात असून, २१ मार्चपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिवन गोयल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली टीबीमुक्त भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचेही डॉ. शिवाजी फुलारी यांनी सांगितले. पत्रपरिषदेस वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉद्य संजय तेलंग आदींची उपस्थिती होती.
आहार किटसाठी पुढाकार घ्यावा...जिल्ह्यात क्षयरोग निदानाचे ३४ केंद्र असून, एक्सरे सेंटरची संख्या १४ आहे. सध्या ७५ निक्षय मित्रांच्या माध्यमातून २०० क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच क्षयरुग्णांना पोषण आहार किट देता यावी, यासाठी दानशुर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
तालुकानिहाय असे आहेत रुग्ण...दोन आठवड्यांपेक्षा अधिक खोकला, ताप असणे, वजनात घट, थुंकीवाटे रक्त पडणे, मानेवर गाठ येणे आदी लक्षणे क्षयरोगाची ओळखली जातात. शासकीय रुग्णालयांतून मोफत तपासणी व औषधोपचार आहेत. जिल्ह्यात १८७१ रुग्ण उपचार घेत असून, यामध्ये अहमदपूर ८६, औसा ११५, चाकूर ५०, देवणी ५४, जळकोट ५३, लातूर ग्रामीण ११९, लातूर शहर ८७३, निलंगा १३१, रेणापूर ४५, शिरुर अनंतपाळ ३४ तर उदगीर तालुक्यात ३११ रुग्ण आहेत.