- संदीप शिंदेलातूर : प्रधानमंत्री स्कूल्स फॉर राइझिंग इंडिया अर्थात 'पीएम-श्री' योजनेंतर्गत शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, याअंतर्गत उच्च दर्जाचे गुणात्मक अन भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील २५२ शाळांची निवड करण्यात आली आहे. योजनेतून शाळा सर्वोत्कृष्ट ठरविण्यासाठी उपक्रम राबविले जाणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक शाळेस १ कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद पाच वर्षांसाठी करण्यात येणार असून, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या शाळांमध्ये केली जाणार आहे.
पीएम श्री योजना केंद्र शासनाने सप्टेंबर २०२२ पासून सुरु केली आहे. या योजनेद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील विविध तरतूदींची अंमलबजावणी करणे, उत्कृष्ट पायाभूत भौतिक सुविधा, याेग्य संसाधने, आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणे आदी उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील २५२ शाळांची निवड या उपक्रमासाठी झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला तसेच शाळांच्या विकासाला चालना मिळणार आहे. प्रत्येक शाळेला भौतिक विकास, क्रीडा, तंत्रज्ञानासोबतच विकासात्मक बाबींसाठी पाच वर्षांत १ कोटी ८८ लाख रुपये दिले जाणार आहेत.
केंद्राचा ६० तर राज्य शासनाचा ४० टक्के वाटा...पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासोबत करार केला आहे. करारानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राज्यात लागू करण्यात येईल. योजनेत केंद्राचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के वाटा राहील. प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद पाच वर्षांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या शाळांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
अंमलबजावणीसाठी सीईओच्या अध्यक्षतेखाली समिती...पीएम श्री योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मनपास्तरावर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती राहणार आहे. योजनेत माजी विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून, शैक्षणिक मदत करता येणार आहे. विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे.
अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण...या शाळांमधून अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मूल्यांकन होईल. शाळांचा भौतिक विकास होणार असून, संगणक, प्रयोगशाळा, क्रीडाविषक बाबी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे.
या तालुक्यातील शाळांचा समावेश...अहमदपूर - २२औसा - ४४चाकूर - १९देवणी - ०९जळकोट - १२लातूर - ४०लातूर मनपा - २निलंगा २६रेणापूर - १६शिरुर अनंत. - १७उदगीर - ३९एकूण - २५२