लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. लातूर जिल्ह्यातील ३९ हजार ७१ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे. बोर्डाच्या वतीने १५३ केंद्रांचे नियोजन करण्यात आले असून, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शालेय जीवनात दहावीची परीक्षा महत्वाची समजली जाते. जिल्ह्यातील ३९ हजार ७१ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते २ या वेळेत मराठी विषयाचा पेपर होणार असून, लातूर विभागीय मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने २२ परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा दक्षता समितीच्य बैठकीतील चर्चेनुसार २९ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळही मिळणार असून, गणित, विज्ञान आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षेदिवशी बैठे पथकही तैनात राहणार आहे. लातूर तालुक्यात ५१ केंद्रावर १४०६५, औसा १३ केंद्रावर ३१०४, निलंगा १६ केंद्रावर ४००१, शिरुर अनंतपाळ ४ केंद्रावर ८४३, देवणी ६ केंद्रावर १२९३, उदगीर २५ केंद्रावर ६०६९, जळकोट ४ केंद्रावर १००२, अहमदपूर १९ केंद्रावर ४६४४ आणि रेणापूर तालुक्यातील ६ केंद्रावर १ हजार ७९५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील परीरक्षक नियुक्त करण्यात आले असून, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांचे विशेष पथक जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.
२९ भरारी पथकांची नियुक्ती...दहावीच्या इंग्रजी, गणित व विज्ञान विषयाच्या पेपरच्या दिवशी भरारी पथकांची विविध केंद्रांना भेटी राहणार आहेत. यासाठीह २९ पथके नियुक्त करण्यात आली आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असल्याचे लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले.