लातूर : दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना आता जिल्ह्यातील ४ हजार २८८ प्रौढ निरक्षरांची परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या रविवारी ही तीन तासांची लेखी परीक्षा होणार आहे. याबाबत योजना शिक्षण संचालकांनी सुचना केल्या आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रौढांना केंद्र सरकारतर्फे साक्षरतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही दिले जाणार आहे. जिल्ह्यात ४१० केंद्र असून, ४ हजार २८८ प्रौढ निरक्षर या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
१५ वर्षांवरील निरक्षरांसाठी नव भारत साक्षरता अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत किती प्रौढ निरक्षर आता साक्षर झाले याची चाचणी रविवारी घेतली जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ४ हजार २८८ निरक्षरांची उल्लास ॲपवर नोंदणी झाली आहे. ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेतली जाणार आहे. निरक्षर व्यक्ती या दरम्यान त्याच्या सोयीच्या वेळेनुसार येऊन तीन तासांचा पेपर देऊ शकणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ मिळणार आहे. उत्तरे लिहिण्यासाठी काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा लागणार आहे.
लातूर ग्रामीणमध्ये ३८ केंद्रावर ३९१, रेणापूर तालुक्यात १२ केंद्रावर २४, औसा १९ केंद्रावर २२१, निलंगा २४ केंद्रावर ९४, शिरुर अनंतपाळ १० केंद्रावर ६१, देवणी ९ केंद्रावर ६५, उदगीर ३८ केंद्रावर २५४, जळकोट ६७ केंद्रावर १४१४, अहमदपूर ११० केंद्रावर ९१०, चाकूर ६१ केंद्रावर ७९३ तर लातूर तालुक्यात २२ केंद्रावर ५८ प्रौढ निरक्षर परीक्षा देणार आहेत.
परीक्षेसाठी अशी राहणार प्रश्नपत्रिका...प्रश्नपत्रिका एकूण १५० गुणांची असून ती पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असेल. भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख लेखन ५० गुण, भाग-ग संख्याज्ञान ५० गुण अशी गुणविभागणी आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के म्हणजे १७ गुण मिळविणे आवश्यक आहे. एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के म्हणजे ५१ गुण मिळविणे आवश्यक असल्याचे योजना विभागाकडून सांगण्यात आले.
ज्या शाळेत नोंदणी तेच केंद्र राहणार...ज्या शाळेतून असाक्षर व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे, ती शाळाच परीक्षा केंद्र राहील. परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा फोटो, मतदान कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणावे. लातूर जिल्ह्यात ४१० केंद्रावर ४ हजार २८८ प्रौढ निरक्षर परीक्षा देणार असून, तालुकानिहाय नियोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सांयकाळी ५ सोयीच्या वेळेनुसार येऊन तीन तासांचा पेपर देता येणार आहे. - अरुणा काळे, उपशिक्षणाधिकारी योजना विभाग