लातूर : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून दहापैकी ५ महाविकास आघाडीकडे तर ५ बाजार समितीवर भाजपने विजय मिळविला आहे. रविवारी निलंगा, औराद शहाजानी, देवणी, अहमदपूर, जळकोट बाजार समितीचा निकाल लागला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, औराद शहजानी, देवणी या तीनही बाजार समितीवर भाजपचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या पॅनलने विजय मिळविला आहे. तर जळकोटमध्ये माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे १५, भाजप प्रणित पॅनलचे ३ विजयी झाले आहेत.
लातूर, रेणापूर बाजार समितीवर माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वात लातूर ग्रामीणचे आ.धीरज देशमुख प्रणित पॅनलने सर्व १८ जागांवर विजय मिळविला आहे. चाकूर बाजार समितीवर भाजपप्रणित पॅनलने सर्वाधिक जागा १० जिंकून वर्चस्व निर्माण केले आहे. औराद शहाजानी बाजार समितीवर आ. निलंगेकर प्रणित पॅनलचे १६ तर व्यापारी असोसिएशनचे २ उमेदवार निवडून आले आहेत. दोन टप्यात झालेल्या निवडणुकीत स्थानिक आमदारांनी बाजार समित्यांवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
अहमदपूरमध्ये फेरमतमोजणी...अहमदपूर बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने १३ तर भाजपप्रणित पॅनलचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपप्रणित पॅनलने मतमोजणीवर आक्षेप घेतल्याने रात्री ८ वाजता फेर मतमाेजणी करण्यात आली.