लातूर : जिल्ह्यातील वाडी-तांड्यावर गाळण्यात येणाऱ्या हातभट्टी अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री आणि आज दिवसभरात धाडी टाकल्या. या कारवाईत पथकाने २० जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून वाहनासह हातभट्टी, देशी-विदेशी दारुसाठा असा जवळपास ३ लाख लाख ६४ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एकूण २१ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उदगीर तालुक्यातील डाेंगरशेळकी तांडा येथे सकाळी हातभट्टी विक्री करताना पथकाने धाड मारली. यावेळी एका महिलेला ताब्यात घेतले. तर दाेन दुचाकी वाहनाचा पाठलाग करुन हातभट्टी, देशी आणि विदेशी दारुची वाहतूक करताना पथकाने लहू राजाराम पवार याला अटक केली. यावेळी ५६ लिटर देशी हातभट्टी, देशी-विदेशी दारु आणि दाेन दुचाकीसह १ लाख ४८ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उदगीर विभागात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल २१ गुन्ह्यात २० जणांना अटक केली असून, तब्बल १३२ लिटर देशी दारु, ७६ लिटर हातभट्टी, आणि २५ लिटर विदेशी दारुसाठा जप्त केला आहे. यामध्ये दाेन वाहनासह अवैध दारुसाठा असा एकूण ३ लाख ६४ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई उदगीर विभागाचे निरीक्षक आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एन.पी. राेटे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, एन.टी. गुणाले, जवान एस.जी. बागेलवाड, संताेष केंद्रे, विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली.
हातभट्टीमुक्त गावासाठी ग्रामरक्षक दलाची स्थापना...गाव हातभट्टीमुक्तीसाठी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी भेट देवून हातभट्टी दारुचे समूळ उच्चटन करण्यासाठी गावपातळीवर ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत गावात ग्रामसभा घेण्याचे पत्र देण्यात आले आहे. चाेरट्या मार्गाने हातभट्टीची निर्मिती करणे, वाहतूक करणे आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींची, ठिकाणांची माहिती देण्याबाबत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार नाेटीसा बजावण्यात आल्या आहेत. हातभट्टीच्या समुळ उच्चाटनासाठी गावेच दत्तक घेण्यात आली आहे.