लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये मागील वर्षीपर्यंत खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळत होते. मात्र, आता नवीन नियमानुसार अर्जदार विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलाेमीटर अंतरात असलेल्या खासगी अनुदानित, जिल्हा परिषद शाळांत प्रवेश मिळणार आहे. परिणामी, शाळांची नोंदणी वाढली असून, आतापर्यंत १७३९ शाळांची नोंदणी शिक्षण विभागाकडे झाली आहे. या शाळांमध्ये २८ हजार ५२१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत.
जिल्ह्यात मागील वर्षी २०० खासगी शाळांची आरटीईसाठी नोंदणी होती. त्यानुसार १६६९ जागांवर प्रवेश झाले होते. मात्र, आता महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत शाळा, कॅन्टोमेंट बोर्ड शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खासगी अनुदानित, स्वंयअर्थसहायित शाळेतही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा व स्वंयअर्थसहायित शाळा नसेल तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, मागील वर्षी तीन किलोमीटर अंतरामध्ये असलेल्या शाळांत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होते. सध्या नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आरटीई प्रवेश प्रकियेमध्ये सद्यस्थितीत केवळ शाळांची नोंदणी सुरु आहे. शिक्षण विभागाकडून अर्जप्रक्रिया, निवड यादीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतरच प्रवेश प्रक्रियेचे संपुर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
कागदपत्रे पडताळणीसाठी समिती गठीत...आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. यामध्ये तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी हे समितीचे अध्यख राहणार असून, केंद्रप्रमुख, शासकीय, विनाअनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण संस्थाचे प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी हे सदस्य राहणार आहेत. तर विस्तार शिक्षण अधिकारी हे सदस्य सचिव राहणार असल्याचे शिक्षण संचालकांनी कळविले आहे. त्यानुसार समितीचे नियोजन करण्यात येत आहे.
विहीत मुदतीनंतर प्रवेश मिळणार नाही...आरटीईच्या पोर्टलवर अर्ज भरल्यावर आपल्याला निवड झाल्याचा संदेश येईल असा पालकांचा समज असतो. त्यामुळे अनेकजण पोर्टलला भेट देत नाही. त्यामुळे काही वेळेस तांत्रिक अडचण असल्यास संदेश येत नाही. परिणामी, विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलला वेळोवेळी भेट द्यावी. दिलेल्या सुचनांचे अवलोकन करावे. विहीत मुदतीनंतर प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही. याची नोंद घेण्याच्या सुचनाही शिक्षण संचालकांनी केल्या आहेत.
दीड हजार जागा पोहचल्या तीस हजारांवर...मागील वर्षी आरटीई प्रक्रियेसाठी २०० शाळांत १६६९ जागांवर प्रवेश झाले. मात्र, यंदा नवीन नियमावलीमुळे १ हजार ७३९ शाळांतील २८ हजार ५२१ जागांवर प्रवेश होणार आहेत. पूर्वी केवळ खासगी शाळांचा समावेश होता. मात्र, आता शासकीय, अनुदानित शाळांचाही समावेश करण्यात आलेला आहे. परिणामी, शासकीय शाळांतील जागाही आरटीईद्वारे भरल्या जाणार आहेत. सध्या केवळ शाळांची नाेंदणी सुरु असल्याने प्रवेश प्रकियेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.