लातूर - नांदेड जिल्ह्यातील कंधारकडे लग्नाला निघालेल्या व्हॅनचा आणि रावणकाेळा येथून उदगीरला निघालेल्या दुचाकीचा रविवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, यात एका महिलेसह दाेन युवक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात जळकाेट-उदगीर महामार्गावरील पाटाेदा गावानजीकच्या वळणावर झाला. याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील हाळी येथून मारुती सुझकी इकाे व्हॅन ही कंधारकडे लग्नासाठी रविवारी सकाळी निघाली हाेती. दरम्यान, जळकाेट तालुक्यातील रावणकाेळा येथून उदगीरच्या दिशेने निघालेली दुचाकी पाटाेदा गावानजीक सकाळी ९:३० वाजता आली असता, भरधाव व्हॅनने (एम.एच. १२ पी.टी. १६८७) दुचाकीला जाेराची धडक दिली. या अपघातामध्ये अर्चना रामकिशन शिंदे (वय ३६ रा. नाडका, ता. कंधार, जि. नांदेड), संदीप बालाजी पांडे (वय २३ रा. रावणकाेळ, ता. जळकाेट जि. लातूर) आणि माेतीराम दिगांबर बिरादार (वय २४ रा. पाटाेदा, ता. जळकाेट, जि. लातूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने उदगीर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, यातील जखमी महिला अर्चना शिंदे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रविवारी सायंकाळी लातूरला हलविण्यात आल्याची माहिती जळकाेट पाेलिसांनी दिली.
अपघातग्रस्त दाेन्ही वाहने पाेलिसांनी घेतली ताब्यात...अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पाेलिस उपनिरीक्षक पी.डी. राठाेड, पाेलिस काॅन्स्टेबल राहुल वडारे, आर.यू. मिटकरी यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून दाेन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातात दाेन्ही वाहनांचे माेठे नुकसान झाले. ती वाहने पाेलिसांनी ताब्यात घेतली असून, व्हॅनचालकाचा पाेलिस शाेध घेत आहेत.
अपघाती वळणावर अनेक घडले अपघात
जळकाेट-उदगीर महामार्गावर पाटाेदा गावानजीक अपघातप्रवण क्षेत्रात वळणरस्ता आहे. या धाेकादायक अपघाती वळणावर आठवड्यातून किमान एक-दाेन अपघाताच्या घटना घडत आहेत. वळणावर आल्यानंतर समाेरचे वाहन अचानक दिसते आणि वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटते. गाेंधळलेल्या, नियंत्रण सुटलेल्या परिस्थितीत भीषण अपघाताच्या घटना घडत असून, या अपघाती वळणाने अनेकांचा बळी घेतला आहे.