लातूर : चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर येथील पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन कारसह दारु असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी लातूर ते निटूर मार्गावर मसलगा शिवारात केली असून, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर ते निटूर मार्गावर एका कारमधून चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला खबऱ्याने दिली. उदगीर येथील पथकाने शनिवारी लातूर ते निटूर मार्गावर सापळा लावला. दरम्यान, कार (एमएच २४ व्ही ३६३३) आल्यानंतर पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन मसलगा शिवारात कार दारुसह पकडली. यावेळी कार आणि देशी दारूचे बाॅक्स असा एकूण २ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीरचे निरीक्षक आर.एम. चाटे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, संताेष केंद्रे, शिरूर अनंतपाळ ठाण्याचे पाेलिस निरीक्षक विठ्ठल दराडे, पाेलिस काॅन्स्टेबल पी.सी. शिंदे यांच्या पथकाने केली.