लातूर : तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले असून, ३७८ शाळांमधील ७ हजार ७६६ विद्यार्थी या सर्वेक्षणाला सामोरे गेले आहेत. उत्तरपत्रिका पुणे येथे जमा करण्यात आल्या असून, आता जिल्ह्याचा या सर्वेक्षणातून काय निकाल समोर येतो, याकडे शाळा आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
दर पाच वर्षांनी शिक्षण विभागाकडून तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार १७ मार्च राेजी सर्वेक्षण घेण्याच्या सुचना होत्या. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वेक्षण पुढे ढकलण्यात आले होते. २३ ते २४ मार्च दरम्यान जिल्ह्यात सर्वेक्षण घेण्यात आले असून, यामध्ये अहमदपूर तालुक्यातील ४०, औसा ४५, चाकूर ३३, देवणी १५, जळकोट १५, लातूर ९०, निलंगा ४४, रेणापूर २१, शिरुर अनंताळ १६ तर उदगीर तालुक्यातील ५९ शाळांतील विद्यार्थी सर्वेक्षणाला सामोरे गेले आहेत.
विद्यार्थ्यांना काय येते हे समजणार...या सर्वेक्षणामध्ये सकाळी सत्रात सर्वेक्षण करण्यात आले. यातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूक स्थिती जाणून घेण्यात आली. तसेच विद्यार्थीनिहाय गुण कुठेही प्रसिद्ध केले जाणार नाही. विद्यार्थ्यांना काय येते हे या सर्वेक्षणातून समोर येणार आहे. सोबतच सर्वेक्षण मराठी माध्यमासाठीच्या शाळांमध्ये घेण्यात आले. प्रथम भाषा मराठी व गणित या दोन विषयांमधील अध्ययन निष्पतीवर आधारित सर्वेक्षण होते.
आठवी वर्गाचे सर्वाधिक विद्यार्थी...अध्ययन संपादणूक सर्वेक्षणास जिल्ह्यातील ३७८ शाळांमधील ७ हजार ७६६ विद्यार्थी सामोरे गेले आहेत. यामध्ये तिसरीचे १ हजार ९८२, पाचवीचे २ हजार २८३ आणि आठवीच्या ३ हजार ५०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या शाळांमधील ३० विद्यार्थी या परीक्षेसाठी होते. दरम्यान, परीक्षेचे पेपर पुणे येथे जमा करण्यात आले आहेत. आता त्याची तपासणी होऊन सर्वेक्षणात जिल्ह्याची काय स्थिती आहे, हे समोर येणार आहे.
सर्वेक्षणास शाळा, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद...दर पाच वर्षांनी तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षीच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील ३७८ शाळा निवडण्यात आल्या. यामध्ये ७ हजार ७६६ विद्यार्थी सर्वेक्षणास सामोरे गेले आहे. योग्य नियोजन आणि शाळा, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्याने सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. लवकरच निकाल जाहीर होईल. डॉ. भागिरथी गिरी, प्राचार्य, डायट