लातूर : शहरातील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने शहरानजीक साई येथे निर्बीजीकरण केंद्र सुरू केले होते; मात्र वेगवेगळ्या अडचणींमुळे केंद्र बंद पडले आहे. एप्रिल, मे दोन महिनेच केंद्र चालले. त्यानंतर जूनपासून केंद्र बंदच असून, ऑपरेशन थिएटरला गळती लागली असून, श्वानांचे पिंजरेही तुटले आहेत. परिणामी, लातूर शहरात मोकाट श्वानांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
लातूर महानगरपालिकेने ग्लोबल उत्कर्ष फाउंडेशन मुंबई या संस्थेला मोकाट श्वानांवर निर्बीजीकरण करण्यासाठी तीन वर्षांचे कंत्राट दिलेले आहे. मार्च २०२२ मध्ये प्रति श्वानासाठी ९९९ रुपये निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी करार झाला आहे; परंतु या ना त्या कारणाने केंद्र बंद पडलेले आहे. मार्च २०२२ पासून ऑगस्ट २०२३ पर्यंत फक्त दोन-तीन महिने शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. प्रारंभी केंद्र परिसरातील नागरिकांनी विरोध केल्यामुळे तत्काळ केंद्र सुरू झाले नाही, तर आता केंद्रातील तांत्रिक अडचणीमुळे शस्त्रक्रिया बंद आहेत.
६०० श्वानांची शस्त्रक्रियाकेंद्र सुरू झाल्यानंतर पाचशे ते सहाशे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया या केंद्रात झाल्या आहेत. एप्रिल महिन्यात २११, मे मध्ये १७१ निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर जूनपासून हे केंद्र बंद पडले आहे. ऑपरेशन थिएटरला गळती लागली असून, पिंजरेही तुटले आहेत. त्यामुळे दुरुस्तीला खर्च करावा लागणार आहे.
शहरात मोकाट श्वानांबरोबर जनावरांची संख्या वाढलीलातूर शहरात १५ ते २० हजारांच्या आसपास मोकाट श्वानांची संख्या आहे. त्यामुळेच महानगरपालिकेने निर्बीजीकरणाचा निर्णय हाती घेतला होता. केंद्र स्थापनेपासून अडथळ्यांची शर्यत आहे. जशी मोकाट श्वानांची संख्या आहे, तशीच रस्त्यांवर ठाण मांडणाऱ्या पशुधनाचीही संख्या आहे. मोकाट श्वान आणि मोकाट पशुधनाचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागत आहे.
निर्बीजीकरणासाठी ९९९ रुपयांचे कंत्राटमुंबई येथील या संस्थेला एका श्वानावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी ९९९ रुपये लातूर मनपाकडून दिले जात आहेत. त्यानंतर शस्त्रक्रियाही सुरू झाली होती; परंतु काम बंद झाले आहे. केंद्राचे काम आणि तांत्रिक अडचण या दोन कारणांमुळे निर्बीजीकरणाला खीळ बसली आहे. त्यामुळे पुढील काळात शहरात पुन्हा श्वानांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जून महिन्यापासून केंद्र कुलूप बंदसुरुवातीला २०२२ मार्च, एप्रिल, मे आणि जुलै महिन्यात शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर २०२३ मध्ये मार्च, एप्रिलमध्ये काही शस्त्रक्रिया झाल्या. फक्त पाच महिने या केंद्रात काम चालले. त्यानंतर शस्त्रक्रिया बंद आहेत. संस्थेला दिलेला कंत्राट कालावधी २०२५ मध्ये संपणार आहे.