लातूर : विद्यार्थ्यांचे माेबाइल चाेरणाऱ्या टाेळीतील तिघांना मंगळवारी २० माेबाइलसह अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत एका परीक्षा केंद्रावर हाॅलबाहेर बॅग ठेवून परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाइल बॅगसह चोरून नेल्याची घटना घडली होती. दरम्यान, एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. त्याचबराेबर इतर पाेलिस ठाण्यांतही मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या गुन्ह्याचा उलगडा करण्याबाबत आदेश दिला. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने आराेपींचा शाेध घेण्यास सुरुवात केली.
पाेलिस पथकाकडून गुन्ह्याबाबत बारकाईने तपास सुरू असताना खबऱ्याने माहिती दिली. त्याचबराेबर तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आरोपींचा शोध घेतला जात हाेता. खबऱ्याकडून मोबाइल चाेरणाऱ्या टाेळीतील आराेपींची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे चाेरीतील मोबाइल कमी पैशात विकणारी टोळी निष्पन्न झाली.
टोळीतील ऋषिकेश उर्फ भुऱ्या सुरेश कुरे (वय १९, रा. रेणापूर ह. मु. लातूर), दिनेश दयानंद पवार (१९, रा. हरंगुळ बु. ह. मु. बार्शी रोड, लातूर), सोमेश राम हिप्परगे (१९, रा. मुरुड ह. मु. विक्रमनगर, लातूर) यांना राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. अधिक कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरलेले विविध कंपनीचे २० मोबाइल, असा १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल, तीन बॅग जप्त करण्यात आल्या आहेत.
इतर चाेरीच्या गुन्ह्यांचा उलगडा हाेण्याची शक्यता...एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोबाइल चोरीचे दाेन गुन्हे उघड झाले असून, इतर मोबाइल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे. तपास एमआयडीसी पाेलिस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकातील नवनाथ हासबे, माधव बिल्लापट्टे, राजेश कंचे, राजू मस्के, तुराब पठाण, प्रदीप स्वामी, जमीर शेख, नकुल पाटील यांनी केली आहे.