लातूर : जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी राज्य कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारी संघटना दुसऱ्या दिवशीही सहभागी होते. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील आरोग्यसेवेवर काहीसा प्रभाव झाला आहे. दरम्यान, तीन नर्सिंग महाविद्यालयांचे प्रशिक्षित विद्यार्थी रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी धावून आल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे ७५० खाटांचे आहे. चांगल्या आणि दर्जेदार आरोग्यसेवेमुळे जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील आणि कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या सीमावर्ती भागातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात जवळपास १३०० रुग्णांची दररोज नोंदणी होते. याशिवाय, आंतररुग्ण विभागात जवळपास ५०० रुग्ण उपचारासाठी दाखल असतात.
राज्य कर्मचारी संघटनेच्या बेमुदत आंदोलनात बुधवारी वैद्यकीय महाविद्यालयातील २७, तर रुग्णालयातील ४४७ परिचारिक, तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. संपाचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये म्हणून वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक ती दखल घेतली होती. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात नेहमीप्रमाणे रुग्ण नोंदणी व तपासणी सुविधा सुरू आहे.
दोन सिझेरियन, तीन नैसर्गिक प्रसूती...संपामुळे रुग्णालय प्रशासनाने नियमित होणाऱ्या शस्त्रक्रिया थांबविल्या आहेत. दरम्यान, बुधवारी तीन नैसर्गिक प्रसूती, दोन सिझेरियन झाले. याशिवाय दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मंगळवारी ९ सिझेरियन, चार मोठ्या शस्त्रक्रिया आणि १४ नेत्र शस्त्रक्रिया झाल्या होत्या.
नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत...रुग्णसेवेसाठी परिचारिकांची गरज असते. मात्र, बहुतांश परिचारिका संपावर आहेत. त्यामुळे विलासराव देशमुख शासकीय नर्सिंग कॉलेज, एमआयटी नर्सिंग कॉलेज आणि न्यू व्हिजन नर्सिंग महाविद्यालयातील प्रशिक्षित विद्यार्थी आरोग्य सेवा देत आहेत. त्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली नाही. पण, काहीसा ताण पडला आहे.- डॉ. समीर जोशी, अधिष्ठाता.
४७४ कर्मचारी आंदोलनात...शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३३ कर्मचारी कामावर आहेत. २७ संपावर आहेत. तसेच रुग्णालयातील ३२ कर्मचारी कामावर असून, ४४७ संपावर आहेत. एकूण ४७४ कर्मचारी आंदोलनात आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ताण पडला आहे.
जिल्हा परिषदेतील अडीच हजार कर्मचारी संपावर...जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ८ हजार ७९८ कर्मचारी आहेत. त्यापैकी २४२ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर आहेत. ६,१६६ कर्मचारी कार्यालयात उपस्थित असून, २ हजार ३९० कर्मचारी संपात आहेत. मंगळवारपेक्षा बुधवारी संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन
जिल्हा परिषद अभियंता संघटनाही आक्रमक...राज्यव्यापी बेमुदत आंदोलनात जिल्हा परिषद अभियंता संघटना सहभागी झाली आहे. त्यामुळे कार्यालय ओस पडल्यासारखे दिसत होते. आंदोलनात अध्यक्ष संगप्पा कपाळे, विठ्ठल बिराजदार, कमलाकर साळुंखे, एल. डी. पवार, वाय.एन. शेख, माधव तांबोळी, कमलाकर मेहत्रे, डी. व्ही. आळंगे, अरुणा उडते आदी सहभागी झाले होते.