राजकुमार जाेंधळे, लातूर : नीट गुणवाढसंदर्भात लातूर-दिल्लीचे कनेक्शन जाेडणाऱ्या इरण्णा काेनगलवारचा माेबाईल नांदेड एटीएसने जप्त केला असून, त्यांच्या माेबाईलमध्ये अनेक एजंटांचा डेटा सेव्ह असल्याचे समोर आले आहे. यात काेणा-काेणा एजंटांची नावे आहेत, काेण-काेण त्याच्या संपर्कात आला आहे, या तपशिलाबाबत मात्र तपास यंत्रणांनी गुप्तता पाळली आहे. सीबीआयच्या चाैकशीत याचा भंडाफाेड हाेईल अन् लातूरसह इतर जिल्ह्यांतील मासे गळाला लागतील, असा संशय बळावला आहे.
लातुरातील नीट गुणवाढसंदर्भातील प्रकरणात तिघा संशयितांच्या घरावर नांदेड एटीएसने २१ जून राेजी छापा टाकला. ही कारवाई दिवसभर सुरू हाेती. चाैकशीनंतर तिघांनाही नाेटीस बजावून साेडून दिले. दरम्यान, तिघांच्या जप्त केलेल्या माेबाईलची सायबर सेलने तपासणी केली. यातून गुणवाढीसंदर्भातील धक्कादायक प्रकार समाेर आले. याबाबत चाैघांविराेधात २४ तासांनंतर गुन्हा दाखल केला असून, दाेघांना अटक केली.
इरण्णाच्या माेबाईमधून गंगाधरचा लागला शाेध...
लातूर नीट गुणवाढ प्रकरणातील आराेपी इरण्णा काेनगलवार आणि दिल्लीतील गंगाधरची भेट हैदराबाद येथे झाल्याचा संदर्भ समाेर आला आहे. इरण्णाच्या माेबाईल काॅल हिस्ट्रीतूनच प्रमुख सूत्रधार गंगाधरचा शाेध लागला. गंगाधर सीबीआयच्या गळाला लागला आहे. मध्यस्थाची भूमिका वठविणारा इरण्णा मात्र पाेलिसांना गुंगारा देत पसार झाला आहे.
चार दिवसांची चौकशी; ‘नीट’चा धागा लांबणार...
शनिवार-रविवारी अटक केलेला मुख्याध्यापक पठाण, शिक्षक जाधव यांची चाैकशी लातूर पाेलिसांनी रात्रं-दिवस केली आहे. या दाेघांनीही चाैकशीत अनेक खुलासे केले आहेत. या चाैकशीतून नीट गुणवाढीसंदर्भातील धागा लांबवर जाणार असल्याची माहिती आता समाेर येत आहे. दाेघांना २ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी मिळाली असली तरी २८ जूनअखेरच तपास पथकाने चाैकशी पूर्णत्वाला नेल्याचे सांगण्यात आले.