लातूर : दुपारची वेळ... रिंगरोड परिसरात वाहतूक तुरळक...एक दुचाकीचालक जात असताना तेवढ्यात पाठीमागून भरधाव आलेल्या टाटा सुमो जीपने दुचाकीचालकाला जोराची धडक दिल्याची घटना घडते. आजूबाजूला असलेल्या वाहनचालकाच्या डोळ्यासमोर हा थरार घडतो.... टाटा सुमोचा चालक एवढ्यावरच थांबत नाही... तर त्या दुचाकीला जवळपास १५० ते २०० फुटापर्यंत फरपटत नेतो. या थरारक अपघातात एका ४० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील वाहनधारक, दुकानदार आणि इतर जीपचालकाचा पाठलाग करतात. तेवढ्यात पोलिसांची गाडी येते... तेही पाठलाग करत जीपसह चालकाला ताब्यात घेतात. हा थरार नांदेड रोडवरील सारोळा रोड चौकात घडला.
पोलिसांनी सांगितले, नय्युम खजमिया शेख टकारी (वय ४०, रा. सनत नगर, मळवटी रोड, लातूर) हे दुपारी रिंगरोड परिसरातील सारोळा चौक येथून आपल्या दुचाकीवरून (एम.एच. २४ ए. ई. ९१०७) जात होते. दरम्यान, पाठीमागून आलेल्या भरधाव टाटा सुमो जीपने (एम.एच.२४ व्ही. ७२१४) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, काही कळायच्या आतच जीपचालकाने दुचाकीला जवळपास १५० ते २०० फुटापर्यंत फरपटत नेले. या अपघातात नय्युम शेख यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती हाकेच्या अंतरावर असलेल्या विवेकानंद चौक पोलिसांना मिळाली. तेवढ्यात अपघातातील जीप चालक हणमंत कुमार बिराजदार (वय २६, रा. सावळसूर-चाकूर ता. उमरगा, जि. धाराशिव) पळून जाईल म्हणून, स्थानिक नागरिक, दुकानदारांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग केला. तर पाठोपाठ पोलिसांनीही त्याचा पाठलाग केला. काही अंतरावर पोलिसांनी जीपसह चालकाला पकडले. घटनास्थळाचा पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जीपचालकाला ताब्यात द्या, असा पवित्रा संतप्त नातेवाइकांनी घेतला. काही वेळ पोलिस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी संतप्त नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला आणि मृतदेह ताब्यात देण्यात आला. असे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर म्हणाले.
याबाबत विवेकानंद चौक ठाण्यात खय्युममिया खजमिया शेख टकारी (३८, रा. लातूर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास अमलदार सय्यद करत आहेत.