चाकूर : येथील सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रातील छत्रपती शिवाजी महाराज परेड मैदानावर १८१ प्रशिक्षित जवानांचा शानदार दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. यावेळी जवानांनी चित्तथरारक कसरती सादर करीत सर्वांचे लक्ष वेधले.
येथील सीमा सुरक्षा दलातील प्रशिक्षित जवानांनी महानिरीक्षक सुरेश चन्द यादव यांना मानवंदना दिली. यावेळी सहाय्यक पोलिस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी उपस्थित होते. जवानांनी देशाच्या सुरक्षिततेची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. १८१ जवांनाना येथील प्रशिक्षण केंद्रात १७ एप्रिल २०२३ ते २० जानेवारी २०२४ असे ३८ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, गुजरात, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, मणिपूर, पंजाब, त्रिपुरा व जम्मू- काश्मीर राज्यातील जवानांचा समावेश आहे. या शानदार समारंभाच्या परेडचे नेतृत्व जवान राहुल शिवाजी यांनी केले. प्रशिक्षण काळातील उत्कृष्ट जवान पंकज तिवारी, रोहित रोहिला, मुकेश ठाकूर, दीपक कुमार, राहुल शिवाजी यांना महानिरीक्षक यादव यांच्या हस्ते गोल्ड व सिल्व्हर मेडल देऊन गौरविण्यात आले. जवानांनी मल्लखांब तसेच अन्य विविध प्रात्यक्षिके दाखविली.
भारत मातेच्या संरक्षणासाठी जवान सज्ज...सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक सुरेश चन्द यादव म्हणाले, भारत मातेच्या सीमाचे चोख संरक्षण करण्यासाठी सीमा सुरक्षा दल सशक्त आहे. शत्रूशी मुकाबला करण्यासाठी या प्रशिक्षण केंद्रात अत्यंत कठीण प्रशिक्षण घेऊन जवान भारत मातेच्या संरक्षणासाठी सज्ज आहे. जवानांनी कायद्याच्या चौकटीत राहून मानवाधिकाराच्या मूल्यांचे जतन करावे. या जवानांना ३८ आठवड्यांचे खडतर आणि कठीणातील कठीण प्रशिक्षण देण्यात आले आहे. जवानांना शारीरिक तंदुरूस्त, शस्त्राचा वापर, गोळा- बारुद, फील्ड क्राॅफ्ट, नकाशाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यात कोणत्याही परिस्थती उद्भवल्यास हे जवान शत्रूशी लढतील. प्रसंगी प्राणाची बाजी लावतील, असा विश्वास महानिरीक्षक यादव यांनी व्यक्त केला. ज्या माता-पित्यांनी आपल्या शूर मुलांना सीमा सुरक्षा दलाच्या माध्यमातून देशसेवेसाठी अर्पण केले. त्यांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.