लातूर : जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत चाेरीचे प्रमाण घसरले आहे. एकीकडे समाजात सुरक्षिततेचा भाव निर्माण करण्याबराेबरच विविध कारवायाही माेठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत. वर नांदेड परिक्षेत्राचे पाेलिस उपमहानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी लातुरात पत्रकारांशी बाेलताना समाधान व्यक्त केले.
नांदेड परिक्षेत्राचा काही दिवसांपूर्वीच शशिकांत महावरकर यांनी पदभार स्वीकारला आहे. ते साेमवारी लातूर जिल्ह्याचा दाैरा केला. यावेळी लातुरातील क्लासेस परिसर समस्यांचा आढावा घेतला. याबाबत पाेलिस प्रशासन कारवाई करत असून, क्लासेस चालकांनी सीसीटीव्ही बसवावेत, अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. उदगीर येथे ३०० घरांच्या वसाहतीचे काम सुरू आहे. अहमदपूर, औसा आणि निलंगा येथील वसाहत प्रस्तावित आहे. यावेळी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, सहायक पाेलिस अधीक्षक निकेतन कदम, पाेलिस उपाअधीक्षक सचिन सांगळे, स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक गजानन भातलवंडे उपस्थित हाेते.
फसवणुकीबाबत पोलिस करणार प्रबाेधन...सध्याला ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्वत्र वाढत आहेत. या संदर्भात प्रबाेधनावर भर दिला जाणार आहे. यासाठी पाेलिस प्रशासनाकडून विशेष कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यातून नागरिकांना सतर्क केले जणार आहे.
वाहतुकीच्या शिस्तीसाठी यांची पाेलिस घेणार मदत...लातूर शहरातील वाहतुकीचा प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यासाठी पाेलिस प्रशासनाने विशेष माेहीम हाती घेतली आहे. बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. लातुरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पाेलिस आता एनसीसी, आरएसपी, स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार आहेत, असेही ते म्हणाले.
दाेन महिन्यांमध्ये चाेऱ्यांचे प्रमाण घटले...लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चाेऱ्या, घरफाेड्या आणि इतर गुन्ह्यांचा पाेलिस उपमहानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी आढावा घेतला. दरम्यान, लातूर जिल्ह्यात गत दाेन महिन्यांत चाेऱ्यांचे प्रमाण घटले आहे.
‘साभार परत’ उपक्रमाचे झाले काैतुक...लातूर पाेलिसांनी ‘साभार परत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ही संकल्पना पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांची असून, दर शनिवारी गांधी चाैक पाेलिस ठाण्याच्या परिसरात ही प्रबाेधन शाळा भरते. यावेळी पालक आणि गुन्हेगारी विश्वाकडे वळणाऱ्या मुलांचे प्रबाेधन, समुपदेशन केले जाते. या उपक्रमाचे पाेलिस महाउपनिरीक्षक महावरकर यांनी काैतुक केले आहे..............