उदगीर : मागील काही दिवसांपासून तुरीचे दर बारा हजार रुपयांच्या आसपास होते. मात्र, शनिवारी तुरीने १२ हजार ४०० रुपयांचा टप्पा पार केला असून, अनेक शेतकऱ्यांनी हा दर मिळण्याच्या अगोदरच तुरीची विक्री केलेली आहे. अगोदरच तुरीचे उत्पादन शेतकऱ्याच्या हाती कमी आलेले होते. त्यामुळे मोजक्यात शेतकऱ्यांना तुरीच्या दरातील वाढीचा फायदा होत आहे. शनिवारी उदगीर बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये हरभऱ्याच्या दरात १५० रुपये प्रतिक्विंटलची वाढ झालेली दिसून आली. तर सोयाबीन ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भावाने विक्री झाले.
उदगीर तालुक्यात व सीमा भागातील शेतकऱ्यांचे तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून पेरणीच्या काळात तुरीची पीक चांगले जोमाने येते. परंतु फुलधारणा धरण्याच्या वेळेत फुलगळती किंवा शेंगा लागण्याच्या काळात किडीचा प्रादुर्भाव, या कारणांमुळे हाती आलेल्या पिकाची शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत नासाडी होत असते. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा कमी केला होता. यावर्षी कडधान्यामध्ये तुरीला चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत असले तरी याचा फायदा मात्र बोटावर मोजता येईल अशाच शेतकऱ्यांना मिळत आहे. शासनाने आयात शुल्क माफ करून हरभऱ्याची बाहेर देशातून आयात करण्यास परवानगी दिल्यामुळे मागील आठवड्यात हरभऱ्याच्या दरात घसरण झाली होती. शासनाच्या या निर्णयाचा परिणाम होऊन व्यापाऱ्यांनी हरभऱ्याची खरेदी करण्यास हात आखडता घेतला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आलेले असतानाच दर घसरणीचा फटका शेतकऱ्याला बसला आहे. मागील आठवड्यात हरभऱ्याची दर ६ हजार १५० प्रतिक्विंटल दराने विक्री झाली होती. परंतु या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दरात १५० रुपये प्रतिक्विंटल दराची वाढ झाली आहे. डाळीला व फुटाण्याला मागणी असल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारात सोयाबीनचे दर स्थिर...पुढील महिन्यापासून खरीप हंगामाची पेरणीचा काळ सुरू होईल. शेतकऱ्यापुढे सोयाबीनशिवाय इतर पिकांचा पर्याय नसल्या कारणामुळे पुन्हा यावर्षी खरिपाच्या पेरणीमध्ये सोयाबीन हे मुख्य पीक राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांकडे दोन वर्षांपासूनचे सोयाबीन विक्रीविना घरी ठेवलेले आहे. दर वाढतील या आशेने ठेवलेला माल आता लाल पडू लागलेला आहे. त्यामुळे बाजारात ४ हजार ५०० च्यावर भाव नाही, तर दुसरीकडे घरात ठेवलेला शेतमाल खराब होत चालल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
शेतमाल विक्रीशिवाय पर्याय नाही...खरीप पेरणीच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीनचा माल विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. सध्या बाजारात शेतमालाची आवक कमी असली तरी पुढील आठवड्यापासून आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. शेतीची मशागत, पेरणी, बियाणे, खतांचे नियोजन करण्यासाठी आर्थिक अडचण येते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन घरीच साठवून आहे. ते शेतकरी बाजारात सोयाबीन विक्री करीत असून, आलेल्या पैशातून मशागतीच्या कामासोबतच खरिपाच्या बियाणांची खरेदी करीत आहेत.
यंदाही सोयाबीनचा पेरा अधिक राहणार...उदगीर तालुक्यात व सीमा भागातील शेतकऱ्यांचे तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून पेरणीच्या काळात तुरीची पीक चांगले जोमाने येते. परंतु फुलधारणा धरण्याच्या वेळेत फुलगळती किंवा शेंगा लागण्याच्या काळात किडीचा प्रादुर्भाव, या कारणांमुळे हाती आलेल्या पिकाची शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत नासाडी होत असते. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा कमी केला होता. आता यंदाच्या हंगामातही सोयाबीनचा पेरा सर्वाधिक राहणार असून, तूर पिकालाही शेतकरी पसंती देतील, असे चित्र आहे.