- राजकुमार जोंधळेलातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनची आवक स्थिरावली आहे. परिणामी, आवक आणि भावही जाग्यावरच थिजला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पदरी यंदा लागवड खर्चही पडला नाही. एकरी उताऱ्यात घट झाल्याने आर्थिक गणितच काेलमडले आहे. सध्याला आडत बाजारातील भावाचा अंदाजच लागत नसल्याने हजार साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सध्या चांगली पंचाईत झाली आहे.
लातूर आडत बाजारात शुक्रवारी तब्बल १० हजार ७३९ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला कमला भाव पाच हजार ६७८ रुपयांचा मिळाला. किमान भाव पाच हजार २५१ आणि सर्वसाधारण भाव पाच हजार ५५५ रुपयांवर लटकला आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात काढण्यासाठी सध्याला शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, फुलात आलेल्या तुलीवरही दमट आणि धुक्याच्या वातावरणाचा परिणाम हाेत आहे. यंदा शेतकऱ्यांना साेयाबीनने मारले असून तूर तारेल, अशी अपेक्षा आहे.
१२,५५३ क्विंटल शेतमालाची आवक...लातूर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी गूळ, गहू, रब्बी ज्वारी, हायब्रीड ज्वारी, पिवळी ज्वारी, हरभरा, तूर, मूग, उडीद, एरंडी, करडई, धने आणि साेयाबीन असा एकूण १२ हजार ५५३ क्विंटल शेतमालाची आवक झाली आहे. एकूण १३ शेतमालामध्ये सर्वाधिक १० हजार ७३९ क्विंटल साेयाबीनची आवक झाली आहे.
लातूर- उदगीरात १०० रुपयांचा फरक...लातूर शहरापाठाेपाठ उदगीर येथील बाजारपेठेतील उलाढाल माेठी आहे. त्यानंतर औराद शहाजानी, अहमदपूर, निलंगा, औसा आणि मुरुड आडत बाजारात हाेते. लातूर आणि उदगीर येथील आडत बाजारात जवळपास ७५ ते १०० रुपयांचा फरक हाेता. यंदाच्या हंगामात उदगीरात पाच हजार ९०० च्या घरात भाव मिळाला. तर लातूरला पाच हजार ८०० रुपयांवर भाव मिळाला.