उदगीर (जि. लातूर) : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला, सुगंधी पदार्थ विक्रीसाठी घेऊन जाताना शहरातील शाहू चौकात पाेलिसांनी पकडले. याप्रकरणी शुक्रवारी दोघांविरुध्द उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पानमसाल्याची किंमत १ लाख ३० हजार २०० रुपये असून साडेतीन लाखाचे वाहन आहे. एकूण किंमत ४ लाख ८० हजार २०० रुपये आहे.
उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, गुरुवारी रात्री ११.४५ वा. च्या सुमारास शहरातील शाहू चौक येथे एमएच २४, एफ ९०८९ या चारचाकी वाहनातून राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाल्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. सदरील वाहन, सुगंधित पानमसाला, गुटखा जप्त करण्यात आला. त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. शुक्रवारी अन्नसुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी नागनाथ गणपतराव गाडवे व अली मोहम्मद उस्मान शेख (दोघेही रा. अहमदपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.