लातूर : जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी येथे भगरीतून २०० जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री १ वा. च्या सुमारास घडली. त्यातील दीडशे जणांवर गावातील मंदिरात तर उर्वरित ५० जणांवर वलांडी येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी सांगितले.
देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. गुरूवारी एकादशी असल्याने सायंकाळी ५ वा.च्या सुमारास भगरीचा फराळ करण्यात आला. या भगरीतून काही जणांना रात्री १२ वा. नंतर अचानक मळमळ होऊन उलट्या होण्यास सुरुवात झाली. तसेच चक्कर येऊन अशक्तपणा जाणवू लागला. त्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य रवि चिलमिले यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील यांना दिली. त्यांनी तातडीने ही माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिली. त्यामुळे वलांडी येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. काळे यांचे आरोग्य पथकाने वाघनाळवाडी येथे दाखल झाले.
आरोग्य पथक तात्काळ दाखल होऊन उपचार सुरु केले. ज्यांना अधिक त्रास होत आहे, अशांना तातडीने वलांडी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उर्वरित रुग्णांवर गावातील मंदिराच्या सभागृहात उपचार सुरू करण्यात आले. आरोग्य पथक तात्काळ दाखल झाले आणि उपचार सुरु केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. बरे झालेल्यांना सुटी देण्यात आली आहे. एकही रुग्ण गंभीर नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी दिली.