लोकमत न्यूज नेटवर्क
निलंगा : येथील शेतकरी बस्वराज राजुरे यांनी शेतीत नवा प्रयोग करत दोन एकरात आयुर्वेदिक शतावरीची लागवड केली आहे. त्यातून त्यांना १८ टन उत्पादन मिळाले असून, साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये खर्च वगळता त्यांना साडेतीन लाखांचा नफा मिळाला आहे.
पारंपरिक शेती परवडत नसल्याने येथील शेतकरी बस्वराज राजुरे यांनी आयुर्वेदिक शतावरीची दोन एकरात लागवड केली. तत्पूर्वी त्यांनी जमिनीची खोल नांगरणी करून कुजलेले शेणखत टाकले. त्यानंतर वरंबा पद्धतीने लागवड केली. दोन सऱ्यांमधील अंतर ६० सेंटिमीटर ठेवले. जमिनीच्या प्रकारानुसार आणि मातीतील उपलब्ध खतांच्या तपासणी अहवालानुसार खतांचे नियोजन केले. लागवडीच्या सुरुवातीला खताची मात्रा दिली. पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापनही केले. पिकाची व्यवस्थित वाढ झाल्यावर १०-१५ दिवसांच्या फरकाने पाणी दिले. उन्हाळ्यात कमीत-कमी ४-६ दिवसांच्या फरकाने पाणी दिले.
शतावरीची काढणी करण्यापूर्वी शेतीला पाणी दिले. त्यानंतर कुदळीने खोदून मुळांची काढणी केली. शतावरीच्या मुळ्यापासून १८ टन उत्पादन मिळाले. या पिकाचे आयुर्वेदातील महत्त्व पाहता पुणे येथील एका कंपनीने २५ रुपये प्रति किलोप्रमाणे जागेवर खरेदी केली. त्यातून साडेचार लाख रुपये मिळाले. एक लाखाचा खर्च वगळता साडेतीन लाख रुपयांचा नफा झाला आहे.
लागवडीसाठी अनुदान...
शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी औषधी वनस्पती शतावरीची लागवड करावी. कृषी विभागामार्फत राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती लागवडीसाठी अनुदान दिले जाते, असे मंडल कृषी अधिकारी रणजित राठोड यांनी सांगितले.
कृषी विभागामार्फत लागवडीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन कृषी सहाय्यक सुनील घारुळे व मंडल कृषी अधिकारी रणजित राठोड यांनी केले. दोन एकरात खर्च वजा जाता साडेतीन लाखांचा नफा मिळाला असल्याचे शेतकरी बस्वराज राजुरे यांनी सांगितले.