थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचे आवाहन
लातूर : लातूर परिमंडळातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील वीजग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे ज्या वीज ग्राहकांकडे बिल थकलेले आहे त्यांनी तात्काळ भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. कृषिपंपधारकांचा वीज बिल भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २ लाख १० हजार शेतकऱ्यांनी ८२ कोटींचे वीज बिल भरले आहे. वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन लातूर परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे शेतशिवाराचा आसरा
लातूर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दरम्यान ग्रामीण भागातील अनेक गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने अनेक ग्रामस्थ कुटुंबासह शेतात राहायला गेल्याचे चित्र आहे. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असून, शेतातच अनेकांचा मुक्काम आहे. औसा, उदगीर, नागरसोगा, निलंगा, जळकोट, देवणी, शिरूर अनंतपाळ, चाकूर आदी तालुक्यांतील ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे. शेतातील गोठ्यात अनेकांचे संसार थाटत असल्याचे चित्र आहे.
ग्रामपंचायतींच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी
लातूर : ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायतींच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण फवारणी तसेच मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले जात आहे. तसेच दवंडीद्वारे जनजागृती केली जात असून, कोणताही आजार अंगावर न काढता नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई
लातूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसार किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाच्या वतीने पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या वतीने गस्त घातली जात असून, वेळेव्यतिरिक्त दुकाने सुरू असल्यास गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली जात आहे. व्यावसायिक, नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेणापूर नाका परिसरात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील रेणापूर नाका परिसरात मनपाची घंटागाडी नियमित येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. परिणामी, अनेक जण रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लाॅटवर कचरा टाकत आहेत. दरम्यान हाच कचरा हवेसोबत रस्त्यावर उडत आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी मनपाच्या स्वच्छता विभागाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष असून, तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
वीजपुरवठा खंडित होत असल्याने गैरसोय
लातूर : शहरासह ग्रामीण भागात सध्या वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे महावितरणच्या वतीने पाऊस असलेल्या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महावितरणच्या वतीनेही मान्सूनपूर्व कामे केली जात आहेत. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने अनेक जण कूलरचा आधार घेतात. मात्र, वीज गुल होत असल्याने गैरसोय होत आहे. त्यातच दोन दिवसांपासून वादळी वारे आणि अवकाळी पाऊस काही ठिकाणी असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.