- हरी मोकाशे (लातूर)
अत्यल्प पावसामुळे यंदा खरिपातील तुरीचा खराटा झाला आहे़ परिणामी, लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत गत आठवड्याच्या तुलनेत सध्या तुरीच्या सर्वसाधारण दरात ७६० रुपयांनी वाढ झाली असून, ४,७३० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे़ दरम्यान, सोयाबीनच्या आवकबरोबर सर्वसाधारण दरही स्थिर असून, तो ३,४०० रुपये आहे़
राज्यातील प्रमुख बाजार समितींमध्ये लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश होतो. येथे जिल्ह्याबरोबरच कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र आंध्र प्रदेशातील शेतमाल विक्रीसाठी येतो़ लातूर बाजार समितीत शेतमालाला चांगला दर मिळतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याने सध्या दररोज २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होत आहे़ यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे़ खरिपातील शेती उत्पादनात मोठी घट झाल्याने त्याचा बाजार समितीतील आवकवर परिणाम झाला आहे़
सध्या सोयाबीनची २०,४७३ क्विंटल दररोज आवक होत आहे़ कमाल दर ३,४९५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ गत आठवड्याच्या तुलनेत १४ रुपयांनी वाढ झाली आहे़ विशेष म्हणजे, शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा ९६ रुपये ज्यादा शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहेत़ त्यामुळे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राच्या आॅनलाईनच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा बाजारपेठेत सोयाबीन विक्री करीत आहेत़ बाजारपेठेत तुरीची आवक ३३७ क्विंटल झाली असून, ती गत आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे़ आवक वाढली असतानाही कमाल दर ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ गत आठवड्याच्या तुलनेत तब्बल ६०० रुपयांनी वाढ झाली आहे़
सर्वसाधारण दरातही ७६० रुपयांनी वाढ होण्याबरोबर किमान दरातही ९५० रुपयांनी वाढ होऊन ४,४११ रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे़ सध्याच्या आठवड्यात तुरीच्या दरात वाढ झाली असली तरी शासनाच्या हमीभावापेक्षा ६७५ रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे़पिवळ्या ज्वारीची आवक स्थिर असून, ती दैनंदिन २७० क्विंटल आहे़ गत आठवड्याच्या तुलनेत कमाल दरात दीडशे रुपयांनी वाढ होऊन ४,७७० रुपये, असा दर राहिला आहे़ किमान दरात २०० रुपयांनी वाढ होऊन भाव ४,५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़
सध्या मुगाची आवक ५९४ क्विंटल होत असून, सर्वसाधारण दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे़ उडदाची आवक निम्म्यावर आली आहे. रबी ज्वारीची आवक वाढली असून, दरातही ६०० रुपयांनी घसरण झाली आहे़ सध्या कमाल दर ३,३०० रुपये, तर साधारण दर २,९०० रुपये मिळत आहे़ सध्या बाजरीस प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर १,८०० रुपये, गहू २,४००, ज्वारी हायब्रीड १,३५०, ज्वारी रबी २,९००, मका १,४५०, हरभरा ४,७२० एकंदरीत, सध्याच्या आठवड्यात डाळीसाठी उपयुक्त असलेल्या हरभरा, मूग, तूर, उडीद या शेतमालाच्या दरात वाढ झाली आहे.