उदगीर : केंद्र सरकारने २ जुलै रोजी मूग वगळता इतर कडधान्यावर स्टॉक लिमिट करण्याबाबत अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेविरुद्ध सर्वच धान्य व्यापारी व दाळमिल मालकांनी विरोध करून बाजार समितीमध्ये धान्य खरेदी बंद केली होती. व्यापारी वर्गाची मागणी लक्षात घेऊन स्टॉक लिमिटमध्ये वाढ केल्याने गुरुवारी बाजारात तूर व हरभऱ्याच्या दरात प्रत्येकी २०० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली. तर सोयाबीनची मात्र विक्रमी दरवाढ हाेत असल्याचे चित्र आहे.
सण-उत्सवाच्या काळात डाळी व तेलाच्या दरात दरवर्षी वाढ होत असते. त्यामुळे यंदा केंद्र सरकारने दर स्थिर राहावेत, म्हणून २ जुलै रोजी मूग वगळता तूर, हरभरा, उडीद, मसूर या कडधान्याच्या डाळींवर साठा मर्यादा ३१ ऑक्टाेबरपर्यंत लागू केली होती. शासनाच्या या आदेशाविरुद्ध राज्यातील सर्व धान्याचे व्यापारी व दाळमिल मालकांनी व बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी बंद करण्याचे ठरवून हा अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी केली होती. परंतु, व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी व ग्राहकांचे हित लक्षात घेता निर्णयात सुधारणा केली आहे. आता दाळमिल चालकांना त्यांच्या कारखान्याच्या वार्षिक क्षमतेच्या २५ वरून ५० टक्क्यांपर्यंत तर ठोक विक्रेत्यांना २०० वरून ५०० टन साठ्यामध्ये वाढ करता येणार आहे. शासनाने केलेल्या बदलाचे परिणाम गुरुवारी बाजारात दिसून आले. तूर व हरभऱ्याच्या दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ झाली. तर सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होत असून, गुरुवारी ८ हजार २०० प्रतीक्विंटल दराने विक्री झाली. जुन्या सोयाबीनचा साठा जवळपास संपत आला असल्याने येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात सण-उत्सव असल्याने सोयाबीन तेलासह इतर सर्वच खाद्य तेलाचे दर वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्राच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना दिलासा...
केंद्र सरकारने साठा मर्यादेमध्ये वाढ केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तूर व हरभऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. पुढील काळात सणासुदीचे दिवस असल्याने दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
- बालाजी बच्चेवार, दाळ मिल चालक
आवक नसल्याने दरात होतेय वाढ...
मागणी व पुरवठ्यामध्ये मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांकडील शेतमाल संपला आहे. मोठ्या व्यापाऱ्यांकडील सोयाबीनचा साठा संपला असून, बाजारात आवक होत नसल्याने सोयाबीनचे दर वाढत आहे. येणाऱ्या काळात सणांचा मौसम चालू होईल, तेव्हा तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
-सागर महाजन, सोयाबीन कारखानदार