रेणापूर : तालुक्यात उन्हाचा पारा वाढत असून, रेणा मध्यम प्रकल्पात सध्या केवळ १०.०६ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या दररोज १० मिलीमीटरने पाण्याचे बाष्पीभवन होत असून, पाच महिन्यांत जवळपास १५ टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर शहरासह दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. या वर्षी रेणापूर तालुक्यात जूनच्या मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही. दमदार, मोठा पाऊस न झाल्याने व परतीचाही पाऊस न झाल्याने नदी, नाले, ओढे वाहिलेच नाहीत. त्यामुळे सध्या नद्यांचे पात्र कोरडेठाक आहे. अर्ध्या तालुक्याची तहान भागविणाऱ्या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठा दमदार पाऊस न झाल्याने कसलाही पाणीसाठा झाला नाही. सध्या रेणा प्रकल्पात १०.०६ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून, नागरिकांतून पुढील काळात पाण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी परतीचा पाऊस झाल्यावर रेणा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होत होता. मात्र, यंदा परतीचा पाऊस न झाल्याने आगामी काळात टंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
रेणा प्रकल्पात २.०६८ दलघमी उपयुक्त साठा...रेणा मध्यम प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणीसाठा २.०६८ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी, एकूण पाणीसाठा ३.१९७ दलघमी असून, शिल्लक पाण्याची टक्केवारी १०.०६ टक्के आहे. मागील पाच महिन्यांत १५ टक्के पाणीसाठा कमी झाला असून, ऑक्टोबर महिन्यामध्ये २४.८५ टक्के पाणीसाठा होता. पाच महिन्यांत जवळपास पंधरा टक्के जलसाठ्यात घट झाली आहे. विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत, त्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणीटंचाई टाळावी, असे आवाहन प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.
प्रकल्पाखालील तीन बॅरेजेस कोरडे...रेणा मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या रेणा नदीवर घनसरगाव, रेणापूर, खरोळा बॅरेजेस आहेत. मात्र, नदीपात्रात पाणी नसल्याने व रेणा प्रकल्पातून पाणी न सोडल्याने हे तिन्ही बॅरेजेस कोरडे पडत आहेत. रेणा मध्यम प्रकल्पातून रेणापूर नगरपंचायतींतर्गत येणाऱ्या रेनापूर शहर, तांडे, वाड्यांना याच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्याच्या घडीला रेणापूरकरांना १३ ते १४ दिवसांनी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे थोड्या-फार प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. प्रशासनाने शेतीसाठी होणारा पाणीपुरवठाही बंद केलेला आहे.