लातूर : जिल्ह्यात पुन्हा लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने धास्ती वाढली आहे. सध्या ४०० पशुधनावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनाचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गाय, बैल बाजारात आणून खरेदी- विक्री करता येणार नाही.
जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव सुरू आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनजागृतीबरोबरच लसीकरणावर भर देण्यात आला. मध्यंतरीच्या कालावधीत जनावरांचे बाजार, शर्यती, प्रदर्शने, वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. तद्नंतर प्रादुर्भाव कमी झाल्याने हे नियम शिथिल करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा लम्पी चर्मराेगाचा संसर्ग वाढू लागला आहे. तो रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरणावर भर देण्यात आला आहे. शिवाय, लम्पीची लक्षणे दिसून येणाऱ्या गोवंशीय पशुधनावर तात्काळ उपचार करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात ३६३ जनावरे दगावली...लम्पीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात एप्रिलपासून आतापर्यंत ३६२ पशुधन दगावले आहे. दरम्यान, हा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात २ लाख ५५ हजार गोवंशीय पशुधन आहे. आतापर्यंत २ लाख ४७ हजार ७६४ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहेत. उर्वरित पशुधनास लसीकरण करण्यात येत आहे.
- डाॅ. सूर्यकांत नागरगोजे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन.
गाेवंशीय पशुधन विक्रीस आणू नये...जिल्ह्यात लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा संसर्ग वाढू नये. तसेच पशुधनाचे संरक्षण व्हावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांचे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लातूर बाजार समितीच्या वतीने दर शनिवारी भरविण्यात येणारा गोवंशीय पशुधनाचा आठवडी बाजार भरणार नाही. पुढील आदेश येईपर्यंत गोवंशीय आठवडी बाजार बंद राहील. त्यामुळे पशुपालकांनी आपले गोवंशीय पशुधन विक्रीसाठी आणू नयेत, असे आवाहन बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, सचिव भगवान दुधाटे यांनी केले आहे.
गोवंशीय पशुधन विक्रीसाठी आणू नये...
जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जनावरांच्या आठवडी बाजारात गोवंशीय पशुधन विक्रीसाठी आणू नयेत, असे आदेश दिले आहेत. सर्व पशुपालकांनी आदेशाचे पालन करावे. तसेच आपल्या पशुधनास लसीकरण करून घ्यावे.- डाॅ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.